महिला विद्यापीठात महापरिनिर्वाण दिनी महामानवास विनम्र अभिवादन

चांदा ब्लास्ट
६ डिसेंबर, महापरिनिर्वाण दिनानिमित्त एस एन डी टी महिला विद्यापीठ, बल्लारपूर आवाराच्या भावपूर्ण वातावरणात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. विद्यापीठाच्या प्रांगणात सर्व विद्यार्थिनी, प्राध्यापकवृंद आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले व सामूहिक पणे श्रद्धांजली वाहिली.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधान निर्माता नव्हते, तर ते सामाजिक न्यायाच्या क्रांतीचे शिल्पकार होते. त्यांनी दिलेले समानता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे मूल्य आजही प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रवासाला दिशा देतात. शिक्षण हीच खरी मुक्ती – हा त्यांचा संदेश विद्यापीठाच्या प्रत्येक वर्गात, प्रत्येक अभ्यासक्रमात आणि विद्यार्थ्याच्या स्वप्नात जिवंत ठेवा” असे वक्तव्य या प्रसंगी बल्लारपूर परिसराचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी केले.
कार्यक्रमात विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ बाळू राठोड व आवाराचे समन्वयक डॉ वेदानंद अलमस्त उपस्थित होते. डॉ. बाळू राठोड यांनी सांगितले की आधुनिक शिक्षण डिजिटल होत असताना आंबेडकरांनी दिलेला “ज्ञान ही शक्ती”हा मूलमंत्र अधिकच महत्त्वाचा ठरतो. सामाजिक परिवर्तनाची ज्योत मनात ठेवून नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांच्या माध्यमातून समाजघडणीचे कार्य करा असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना केले. या वेळी सर्व प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी डॉ आंबेडकरांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.



