महिला दिनानिमित्त आरसीईआरटीमध्ये स्तन कर्करोग जनजागृती कार्यक्रम
महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :_ आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च अँड टेक्नॉलॉजी (आरसीईआरटी), चंद्रपूर येथे स्तन कर्करोग जनजागृती विषयावर विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरूकता वाढावी आणि स्तन कर्करोगाचे वेळेत निदान होऊन उपचार शक्य व्हावेत, या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आरसीईआरटीचे प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरनल कम्प्लेंट कमिटी, वेलनेस क्लब, स्वयंसिद्धा सेल (आरसीईआरटी) तसेच आरंभ – विंग्ज ऑफ होप आणि मॅक्स हेल्थ केअर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी इंटरनल कम्प्लेंट कमिटीच्या अध्यक्षा व शैक्षणिक विभाग प्रमुख डॉ. अल्का सावलीकर यांनी प्रास्ताविकातून स्तन कर्करोगाबाबत समाजात जागरूकता निर्माण होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. महिलांनी नियमित आरोग्य तपासणी करणे, शरीरातील बदलांकडे दुर्लक्ष न करणे आणि लवकर निदान केल्यास कर्करोगावर मात करणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्रीरोगतज्ञ डॉ. प्राजक्ता असवार उपस्थित होत्या. त्यांनी स्तन कर्करोगाची प्राथमिक लक्षणे, जोखीम घटक, स्व-तपासणी (Self Breast Examination) पद्धती तसेच वेळोवेळी वैद्यकीय तपासणीचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. महिलांनी भीती किंवा संकोच न बाळगता आरोग्याविषयी खुलेपणाने चर्चा करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी आरंभ – विंग्ज ऑफ होप व मॅक्स हेल्थ केअरच्या वतीने डॉ. नेहा सोनारकर, डॉ. प्रभोती कयाल आणि डॉ. सुषमा यांनीही महिलांच्या सर्वांगीण आरोग्याविषयी मार्गदर्शन करत संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य आणि वेळेवर तपासणी यांचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाला वेलनेस क्लबच्या अध्यक्षा डॉ. देवश्री कोडगिरे, स्वयंसिद्धा सेलच्या अध्यक्षा प्रा. अनुराधा दखणे तसेच सदस्य प्रा. श्रीदेवी अक्केवार यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी इंटरनल कम्प्लेंट कमिटीच्या सचिव डॉ. वैशाली पिंपळशेंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात प्राध्यापिका व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. स्तन कर्करोगाबाबत योग्य माहिती मिळाल्याने आरोग्याबाबत सजग राहण्याचा आणि इतर महिलांमध्येही जागरूकता निर्माण करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघना रमेश जाधव यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला आरोग्याविषयी सकारात्मक संदेश देत आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य सार्थ ठरले.



