प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे – मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण
मराठी भाषा गौरव दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : मराठी भाषा विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय व माध्यमिक शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने वि.वा.शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंती निमित्त शिवशंकर अग्निहोत्री सभागृह येथे मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे उद्घाटनप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी सांगितले.
कार्यक्रमास पराग सोमण यांच्यासह माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.जयश्री घारफळकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी रुपेश कांबळे, प्रमुख वक्ता म्हणून जय महाकाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री व डॉ.वंदना पळसापुरे, मराठी भाषा गौरव दिन समितीचे संदीप चिचाटे, आशिष पोहाणे, प्रवीण चाळके, मारोती चवरे, पद्माकर बाविस्कर, रत्ना चौधरी, प्राचार्य निळकंठ ढोबाळे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा, संत-शूरांची आणि समृद्ध साहित्याची जननी आहे. अमृतातेही पैजा जिंके अशा या भाषेचा गोडवा, ज्ञानदेवांपासून कुसुमाग्रजांपर्यंतच्या साहित्यातून थोरवी गातो. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी म्हणत या संस्कृतीच्या, ज्ञानाच्या आणि आपल्या अस्मितेच्या भाषेचा वापर करून जतन करणे हे आपले कर्तव्य आहे, असे मत श्री.सोमण यांनी व्यक्त केले.
प्रमुख वक्ता पंडित शंकरप्रसाद अग्निहोत्री यांनी उच्च शिक्षित लोकांच्या विचारांचा लेखा-जोखा म्हणजे साहित्य आहे. साहित्यातून अन्वेषण निर्माण झाले तरच त्यातून भाषेचा आविष्कार घडवून येतो. मराठी ही आपली मायबोली आहे, त्यामुळे आपण आपल्या मायबोलीतच बोलले पाहिजे, असे मत व्यक्त केले. डॉ.वंदना पळसापुरे यांनी मराठी भाषा व त्याची व्याप्ती, त्याचे संवर्धन, डिजिटल युगात मराठी समोरची आव्हाने यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे संचलन ज्योती भगत यांनी केले तर आभार संदिप चिचाटे यांनी मानले.
यावेळी मराठी साहित्य क्षेत्रातील कवी, गजलकार, लेखक योगेश बडे, महेश महाजन, प्रीती वाडीभस्मे, वृषाली मारतोडे, कविता बेदरकर, तेजस भातकुलकर यांचा सत्कार करण्यात आला. मराठी पाऊल पडते पुढे हा संदीप चिचाटे निर्मित मराठी लोकगीतांचा कार्यक्रम जीवन बांगडे, सानिका बोभाटे, प्रांजली गायकवाड, मयूर पटाईत यांनी सादर केला. प्रशांत उमरे, स्वप्नील कावळे, रोमित गलांडे यांनी साथसंगत केली.
गिरीश काळे यांच्या मराठी भाषा हस्तलिखिताचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी चित्रकला , निबंध व शोधनिबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण प्रवीण चाळके, मारोती चवरे, विपीन मगरे, सुभाष राठोड, विशाल जाचक, मनोज बाचले यांनी केले. डॉ.गजानन जंगमवार, डॉ.चंद्रकात कोठारे, डॉ.दीपक पुनसे, डॉ.निरजसिंह यादव, डॉ.दिनेश वंजारी, अभिजित रघुवंशी, गणेश काळे यांच्यासह सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांची उपस्थिती होती.



