धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘प्रतिहेक्टरी वीस हजार बोनस’ जाहीर करा
आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट
अवकाळी पावसामुळे कोट्यवधींचे नुकसान; शेतकरी आर्थिक संकटात
आ.मुनगंटीवार यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात निर्णय घेण्याची व्यक्त केली अपेक्षा
चंद्रपूर – अवकाळी पावसाने हादरलेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना चालू हंगामात तात्काळ आर्थिक दिलासा मिळावा यासाठी प्रतिहेक्टरी २० हजार रुपये बोनस जाहीर करावा, अशी आग्रही मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात झालेले पीकनुकसान आणि त्यातून शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक संकट लक्षात घेऊन ही मागणीचे अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमीच खंबीरपणे उभे राहत असल्याने शेतकरी बांधव आपल्या सरकारकडून आशावादी आहे. मागील वर्षी नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी २० हजार रूपये धान बोनस देण्याच्या माझ्या विनंतीस मान देत आपण धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी तात्काळ बोनस जाहीर करून त्यांच्या आर्थिक संकटातून मोठी मुक्तता केली. या संवेदनशील निर्णयाबद्दल आपले मनःपूर्वक आभार, असे आ. मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.
चालू वर्षातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक कुटुंबांसमोर आर्थिक अनिश्चिततेचे संकट उभे राहिले असून शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे यंदाही बोनस जाहीर करणे अत्यावश्यक बनले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनात नोंदणीकृत धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रतिहेक्टरी ₹२०,००० बोनस जाहीर करावा, अशी राज्यभरातून सातत्याने मागणी होत आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाचा विचार करून शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यासाठी संबंधित विभागांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी आग्रही मागणी आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.



