एमपीएससीतून डीवायएसपी पदावर बुद्धिवान निखाडे
येल्लापूरमध्ये उत्साहात सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील येल्लापूर येथील रहिवासी आयु. बुद्धिवान बिंबिसार निखाडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत घवघवीत यश संपादन करून डीवायएसपी पदावर निवड मिळविल्याबद्दल त्यांचा गावकऱ्यांच्या वतीने उत्साहात सत्कार करण्यात आला. हा सत्कार समारंभ निशिकांत सोनकांबळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना निशिकांत सोनकांबळे यांनी बुद्धिवान निखाडे यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या बळावर हे यश मिळवले असून त्यांनी कुटुंबासह गाव आणि समाजाचे नाव उज्ज्वल केले. विशेष म्हणजे त्यांनी विविध विभागांतील पीएसआय, एसटीआय, एएसओ, असिस्टंट बीडीओ, एसीपी, डीवायएसपी यांसह तब्बल नऊ पदांमध्ये यश मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली असे सांगितले.
याप्रसंगी निशिकांत सोनकांबळे यांनी संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला तसेच संविधानाप्रती आपली जबाबदारी समजून प्रामाणिकपणे कार्य करावे, असे मार्गदर्शन केले. गावातील युवक मंडळी व ग्रामस्थांच्या वतीनेही बुद्धिवान निखाडे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या यशाचे कौतुक करत युवक-युवतींनी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांद्वारे मोठे ध्येय गाठावे, असे आवाहन केले.
सत्कारमूर्ती बुद्धिवान निखाडे यांनी आपल्या मनोगतातून यशामागील संघर्ष, चिकाटी आणि मेहनतीचा प्रवास सांगत उपस्थित युवकांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी जि.प.सदस्या प्रियाताई सोनकांबळे, विनोद बरडे, पोलीस पाटील उद्धवकुमार जोंधळे, सोनेराव पेंदोर, भास्कर सोनकांबळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाला गावातील मान्यवर, समाजबंधू-भगिनी तसेच मोठ्या संख्येने युवक-युवती उपस्थित होते. प्रास्ताविक दिपक साबने यांनी केले. सूत्रसंचालन संभाजी ढगे यांनी तर आभार प्रभाकर कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सोनकांबळे, कल्याण सरोदे, स्वप्नील साळवे, कांचन कांबळे, विकास बनसोडे, ज्ञानपाल सरोदे यांच्यासह सर्व युवक मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.



