ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा पोलीस दलाच्या कन्यकांचा जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर झेंडा! 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा पोलीस दलासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब समोर आली आहे. दलातील दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कन्यकांनी नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये अभूतपूर्व कामगिरी करत पोलीस दलाची आणि जिल्ह्याची मान उंचावली आहे. त्यांच्या या लक्षणीय यशामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

जागतिक विश्वविक्रमः ७ वर्षीय आर्या पंकज टाकोने (धावपटू)

पोलीस मुख्यालय वर्धा येथे कार्यरत असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज टाकोने यांची कन्या, अवघ्या सात वर्षीय धावपटू आर्या पंकज टाकोने हिने बारामती, पुणे येथे झालेल्या B.S.F. मॅरेथॉन स्पर्धेत जागतिक विश्वविक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे.

विक्रमी कामगिरीः आर्याने 5000 मीटर (५ किलोमीटर) अंतर केवळ २४ मिनिटे, २२ सेकंद आणि ०१ मिलीसेकंद (24:22:01) या वेळेत धावून पूर्ण केले. इतक्या कमी वयात जगभरात कोणत्याही धावपटूला ५००० मीटर इतक्या कमी वेळात पूर्ण करता आलेले नाही. तिच्या या असामान्य कामगिरीची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केली जाणार

असून, तिचा सत्कार ब्रिटिश पार्लमेंटमध्ये होणार आहे.

राष्ट्रीय अजिंक्यपदः १३ वर्षीय ईश्वरी विक्रम काळमेघ (अॅक्वाथलॉन)

सेलू पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस अंमलदार विक्रम काळमेघ यांची कन्या, ईश्वरी विक्रम काळमेघ (वय १३) हिनेही राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट यश संपादन केले आहे.

स्पर्धाः नॅशनल सब-ज्युनियर & ज्युनियर अॅक्वाथलॉन चॅम्पियनशिप (१५ वर्षांखालील मुली). आयोजकः इंडियन ट्रायथलॉन फेडरेशन आणि मध्य प्रदेश ट्रायथलॉन असोसिएशन.

ठिकाणः प्रकाश तरन पुष्कर, भोपाळ, मध्य प्रदेश.

कामगिरीः अॅक्वाथलॉन (३५० मीटर स्विमिंग ३ किलोमीटर रनिंग) ही स्पर्धा ईश्वरीने अवघ्या १७ मिनिटे, ५६ सेकंद आणि ०७ मिलीसेकंद या वेळेत पूर्ण करून प्रथम क्रमांक पटकावला.

पोलीस अधीक्षकांकडून विशेष अभिनंदन

या दोन्ही मुलींच्या असाधारण कामगिरीबद्दल वर्धा पोलीस दलात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. वर्धा पोलीस दलासाठी ही बाब अत्यंत अभिमानाची असल्याने, मा. पोलीस अधीक्षक, वर्धा श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, यांनी त्यांच्या दालनात या दोन्ही उल्लेखनीय खेळाडूंचे आणि त्यांच्या पालकांचे विशेष अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राखीव पोलीस निरीक्षक श्री. शेख मजीद शेख बशीर पोलीस मुख्यालय वर्धा, तसेच क्रीडा प्रशिक्षक श्री. राजू उमरे हे उपस्थित होते.

वर्धा पोलीस दलाच्या कन्यकांनी आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले हे यश इतरांसाठी प्रेरणास्रोत ठरणारे आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये