ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जनतेला सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी कटिबद्ध _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिला विश्वास

बल्लारपूर येथील कळमना येथे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट

बल्लारपूर :- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे आणि विशेष पुढाकारातून बल्लारपूर तालुक्यातील कळमना येथे जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ₹२ कोटी ६८ लाख २९ हजार ८५० रुपये किंमतीचे स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी गोरगरीब जनतेला सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंता दिनदयाल मटाले, गटविकास अधिकारी धनंजय साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. आशा साळवे, डॉ. शिवम बाहेती, जिल्हा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, तालुकाध्यक्ष डॉ. चंद्रकांत देऊळकर, उपसरपंच रुपेश पोडे, राजू बुद्धलवार, वैशाली बुद्धलवार, सुनिल फरकडे, किशोर पंदीलवार, रमेश पिपरे, हरीश गेडाम, स्नेहाताई टिंबडिया आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, जनतेची उत्तम आरोग्यसेवा व्हावी, यासाठी या प्रकल्पाचे काम मी हाती घेतले. या देशाच्या प्रगतीचा खरा आधार कष्टकरी आहे. दुर्दैवाने कष्ट करणाऱ्यासाठी उत्तम आरोग्यसेवांचा अभाव होता. गरिबांच्या सेवेचे खरे केंद्र प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ६५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पहिल्या टप्प्यात १४ नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम केले. दुसऱ्या टप्प्यात ३१ प्राथमिक आरोग्य केंद्राचे स्मार्ट प्राथमिक केंद्रामध्ये रूपांतर करण्यात आले. आरोग्याच्या संदर्भात पाहिजे तशी जागरुकता अद्याप नाही. ती निर्माण होण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.

२८० कोटींच्या १४० खाटांचे टाटा कॅन्सर हॉस्पिटल होत आहे. २२ डिसेंबरला त्याचे उद्घाटन होणार आहे. देशातील पहिले हेलियमविरहित मशीन चंद्रपूरच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये असणार आहे. जानेवारीमध्ये चंद्रपूरच्या मेडिकल कॉलेजचे उद्घाटन देशाचे गृहमंत्री श्री. अमितजी शहा यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. आपल्या जिल्ह्यातील आरोग्यसेवा इतर जिल्ह्यांपेक्षा वेगळी असावी, यासाठी प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये खासगी दवाखान्यांपेक्षा उत्तम सोयीसुविधा आहेत. जनतेच्या आशीर्वादामुळेच नवनवीन कल्पना मांडणे शक्य होत असते. पण त्यासाठी चांगले अधिकारी देखील आवश्यक असतात. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी जीव ओतून काम करण्यासाठी लक्ष दिले, त्यांचे विशेष कौतुक आ. मुनगंटीवार यांनी केले. त्यामुळे अव्वल दर्जाची इमारत आणि सोयीसुविधा निर्माण झाल्या आहेत. या विभागाची सेवा करण्याची संधी मिळाली, यासाठी स्वतःला भाग्यवान समजतो, अश्या भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.

मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र विशेषबाब म्हणून मंजूर..

मानोरा प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्या आकृतीबंधात नव्हते. या केंद्राच्या कामासाठी अडचणी येत होत्या पण २०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी लोकांनी आग्रह केला. त्यानंतर मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांना विशेष बाब म्हणून मंजुरी देण्याचा आग्रह केला, त्याला मंत्रिमंडळात मंजुरी मिळाली याचा विशेषत्वाने आ.मुनगंटीवार यांनी याचा उल्लेख केला.

उमरी पोतदार येथील सुसज्ज आरोग्य केंद्र

पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र संकुलासाठी ८ कोटी ७५ लाख २५ हजार रुपये आणि स्मार्ट आरोग्य केंद्रासाठी १ कोटी ३२ लाख ७७ हजार ४९० इतका रुपयांचा निधी मंजूर करून आरोग्य मंदिर उभारलेले आहे. नुकतेच उमरी पोतदार येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन झाले, अतिशय उत्तम सुसज्ज असे प्राथमिक आरोग्य केंद्र झाले आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

महिलांच्या आरोग्याची काळजी

आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात योग्यवेळी निदान न झाल्यामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. सर्वायकल कॅन्सरच्या संदर्भात लसीकरण करण्याची गरज आहे, हा मुद्दा मी विधानसभेत मांडला. त्यावर चर्चा झाली. आरोग्यमंत्र्यांनी १४ वर्षांच्या मुलींपासून सुरुवात करण्याचा शब्द दिला. योग्य क्षणी निदान झाले तर महिलांचे प्राण वाचू शकतात. महिला कुटुंबाची काळजी करण्यात स्वतःची काळजी घेणे विसरते. पण महिलांचे आरोग्य उत्तम राहिले तर कुटुंबाचे राहील आणि कुटुंबाचे राहिले तर समाजाचे आणि पर्यायाने देशाचे आरोग्य उत्तम राहील.’

लाडक्या बहिणींसाठी ‘पिंक ओपीडी’

पिंक ओपीडी ही व्यवस्था आपण निर्माण करतोय. यामध्ये महिलांच्या आरोग्याची सर्वांत पहिले काळजी घेतली जाईल. लाडक्या बहिणीच्या तब्येतीची काळजी घ्यावीच लागेल. याचा प्रस्ताव सरकारला पाठवला आहे. त्याला मंजुरी मिळाली तर ही सेवा असलेला कोल्हापूरनंतर चंद्रपूर हा एकमेव जिल्हा असेल, अशी माहिती आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिली.

कोठारी येथील पीएचसी आदर्श ठरावे

कोठारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र उत्तम करा. येथील केंद्रात डॉक्टर व कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था उत्तम करा. डॉक्टर सहज उपलब्ध होईल, याचा विचार करा. हे एक मॉडेल पीएचसी करा, अशा सूचना आ. श्री. मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पुण्य कमावण्यासाठी दानच द्यावे लागते असे नाही. सोने, चांदी दिल्यावर जेवढे पुण्य लागत नाही, त्यापेक्षा जास्त गरिबांची सेवा केल्याने लागत असते. त्यामुळे गरिबांच्या आरोग्यसेवेसाठी डॉक्टरांसह सर्व कर्मचाऱ्यांनी तत्पर राहावे, असा माझा आग्रह आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे हेलिपॅडची सुविधा

महाराष्ट्रातील कोणत्याही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हेलिकॉप्टर ॲम्बुलन्ससाठी हेलिपॅडची व्यवस्था नाही. मात्र, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे राज्यातील एकमेव महाविद्यालय आहे, जिथे हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच, 140 खाटांचे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन लवकरच करण्यात येणार आहे. या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये हेलियम न वापरणारी देशातील पहिली एमआरआय मशीन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१.५ कोटी रुपयांची कॅन्सर निदान वॅन लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच जिल्ह्यात कॅन्सर तपासणी शिबिरे देखील आयोजित करण्यात येत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये