वाचन संस्कृती टिकवण्यासाठी नवीन ग्रंथालयांना अनुदान द्या
खा.धानोरकर यांची राज्य सरकारकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट
आजच्या डिजिटल युगात आणि सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. ही संस्कृती पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि तरुणांना ज्ञानाकडे वळवण्यासाठी राज्यात नवीन ग्रंथालये स्थापन करण्यास सरकारने प्रोत्साहन दिले पाहिजे. यासाठी आगामी अर्थसंकल्पात नवीन ग्रंथालयांच्या अनुदानासाठी विशेष तरतूद करण्यात यावी, अशी लोकहितकारी मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कोणत्याही प्रगत समाजाच्या वैचारिक जडणघडणीत ग्रंथालयांचा वाटा मोलाचा असतो. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून राज्यात नवीन ग्रंथालयांच्या नोंदणीवर आणि त्यांना मिळणाऱ्या अनुदानावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे. यामुळे ग्रामीण भागातील वाचक आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. ज्या जुन्या संस्थांना अनुदान मिळत होते, त्यांपैकी अनेक ग्रंथालये तांत्रिक अडचणींमुळे किंवा निधीअभावी बंद पडली आहेत, ही अत्यंत खेदाची बाब आहे.
या गंभीर समस्येकडे राज्य सरकारचे लक्ष वेधताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मागणी केली की, “सरकारने केवळ जुन्या ग्रंथालयांचे प्रश्न न सोडवता, नवीन पिढीसाठी अद्ययावत ग्रंथालये सुरू करण्याकरिता प्रोत्साहन दिले पाहिजे. बंद पडलेल्या ग्रंथालयांचे थकीत अनुदान त्वरित वितरित करावे आणि नवीन ग्रंथालयांना शासनाच्या अनुदान यादीत समाविष्ट करण्यासाठी या अर्थसंकल्पात विशेष निधीची तरतूद करावी.”
राज्यातील वाचन चळवळ अधिक मजबूत झाल्यास सुसंस्कृत समाज घडण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करण्याची विनंती राज्य सरकारला केली आहे.



