“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्षानिमित्त भद्रावतीत देशभक्तीचा जल्लोष!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रेरणास्रोत ठरलेले गीत ‘वंदे मातरम’ या गीताला यंदा ७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक आणि अभिमानास्पद निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रात देशभक्तीचा उत्सव साजरा करण्यात येत आहे. राज्यातील सर्व शासकीय तसेच खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विद्यापीठे आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात आले.
भद्रावती शहरातील यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात सकाळी ९.३० वाजता कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यानंतर सकाळी ०९.५० वाजता विद्यार्थ्यांसह शिक्षक, नागरिक आणि सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या ‘वंदे मातरम’ गीताचे गायन केले. वातावरण देशभक्तीच्या भावनेने भारलेले होते. त्यानंतर देशभक्तीपर भाषणे, नाटिका सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बालाजी कदम उपजिल्हाधिकारी तथा तहसीलदार भद्रावती, प्रमुख वक्ते प्रा. विवेक सरपटवार, प्रमुख पाहुणे मिश्रा सहायक पोलीस निरीक्षक भद्रावती, भद्रावतीचे तालुका कृषी अधिकारी सुशिल आडे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीचे प्राचार्य राजु श्रीरामे, यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे प्राचार्य डॉ. सुधीर मोते, सहायक गटविकास अधिकारी डॉ. बंडू आकनुरवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यामिनी बोपले यांनी केले, संचालन राजश्री उमाळे यांनी पार पाडले तर सोनल वावरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावतीचे तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था भद्रावतीचे शिक्षक, कर्मचारी, भद्रावती येथील सर्व शाळांचे मुख्याध्यापक तसेच वंदे मातरम समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.



