घुग्घुस शहराला मिळणार मुबलक पाणीपुरवठा – अमृत २.० योजनेतून ९३.९८ कोटींचा निधी मंजूर
मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी केली चर्चा

चांदा ब्लास्ट
घुग्घुस शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला नवा जीवदान मिळाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने केंद्र पुरस्कृत ‘अमृत २.० अभियान’ अंतर्गत घुग्घुस नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकूण ९३.९८ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. शासनाचा निर्णय नगर विकास विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला असून, यामुळे घुग्घुस शहराला शुद्ध, स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांनी मुंबई मंत्रालयात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधीबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या भेटीदरम्यान घुग्घुस शहरातील पाणीपुरवठा प्रकल्प, मतदारसंघातील विविध प्रलंबित विकास कामे आणि शहराच्या सर्वांगीण विकास संदर्भात सविस्तर चर्चा झाली.
या प्रकल्पासाठी केंद्र शासनाचा हिस्सा ४५ टक्के, राज्य शासनाचा हिस्सा ४५ टक्के आणि नगरपरिषदेचा (स्वतःच्या संस्थेचा) हिस्सा ५ टक्के इतका असणार आहे. प्रकल्पाचे काम कार्यादेश मिळाल्यानंतर १८ महिन्यांच्या आत पूर्ण करणे बंधनकारक राहणार असून, त्याचे कार्यान्वयन घुग्घुस नगरपरिषद अधिकारी यांच्या देखरेखीखाली करण्यात येणार आहे. मागील काही वर्षांपासून घुग्घुस शहराला पाण्याच्या टंचाईचा तीव्र सामना करावा लागत होता. अनेक प्रभागांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या प्रकल्पामुळे घुग्घुस शहरात अखंड, शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा होणार असून, नागरिकांच्या दीर्घकालीन मागणीची पूर्तता होणार आहे.
भेटीनंतर बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले घुग्घुससाठी अमृत २.० योजनेतून मिळालेला निधी हा ऐतिहासिक निर्णय आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला नेहमीच प्राधान्य दिले आहे. या निर्णयामुळे घुग्घुस शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल आणि शहराच्या विकासाला गती मिळेल. मुख्यमंत्री यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्याने गती देण्याचे आश्वासनही दिले आहे. आगामी काही महिन्यांत प्रकल्पाच्या कामांना सुरुवात होऊन नागरिकांना याचा थेट लाभ मिळणार असे ते म्हणाले.



