जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या
शिवसेना उबाठाचे तहसील कार्यालयात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यात तथा जिल्ह्यात गेल्या एक महिन्यापासून झालेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडून तो हवालदिल झाला आहे.
त्यामुळे त्याला सावरण्यासाठी शासनाने हेक्टरी एक लाख रुपयाची मदत करावी व नुकसान भरपाईची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशा मागणीचे निवेदन शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे यांच्या नेतृत्वात शिवसेनेतर्फे भद्रावती तहसील कार्यालयात तहसीलदारांना सादर करण्यात आले आहे. याशिवाय पीक विमा कंपन्यांना जबाबदार धरून शेतकऱ्यांना विम्याची रक्कम मिळवून द्यावी.
रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बी- बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे. शेतकऱ्यांच्या मुलांना स्थानिक कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करावा. अशा मागण्याही सदर निवेदनातून करण्यात आल्या आहे. निवेदन सादर करताना जिल्हाप्रमुख भास्कर ताजणे, किशोर विधाते, कैलास दूध कोहळे, सुंदरसिंग बावरे, सचिन डुकरे आदी उपस्थित होते.