निवडणूक संदर्भात राजकीय पक्ष व उमेदवारांची संयुक्त बैठक
निवडणूक प्रक्रिया, EVM व्यवस्थापन व मतमोजणीबाबत सविस्तर मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट
शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया व नियोजनाबाबत सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व उमेदवार यांची संयुक्त बैठक ८ जानेवारी रोजी दुपारी ४.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्री. अकुनुरी नरेश, पोलीस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी,तसेच सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित होते. बैठकीदरम्यान आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया, EVM व्यवस्थापन, मतदान साहित्य वितरण, मतमोजणी केंद्रांची व्यवस्था तसेच आदर्श आचारसंहिता याबाबत सविस्तर माहिती दिली.
EVM कमिशनिंग व स्ट्राँगरूम –
चंद्रपूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान दिनांक १५ जानेवारी २०२६, तर मतमोजणी दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे.
दिनांक १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता झोन क्रमांक ३, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे EVM कमिशनिंग व स्ट्राँगरूमची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडणार असून यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी व उमेदवार उपस्थित राहू शकतील, असे सांगण्यात आले.
मतदान साहित्य वितरण व स्वीकृती –
दिनांक १४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजता मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य व EVM वाटप झोन क्रमांक ३, बंगाली कॅम्प येथून करण्यात येणार आहे.
तसेच मतदानानंतर १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर मतदान साहित्य व EVM पुन्हा स्वीकारून स्ट्राँगरूममध्ये जमा करण्यात येणार आहेत.
मतमोजणी केंद्र व व्यवस्था –
मतमोजणी केंद्र झोन क्रमांक ३, बंगाली कॅम्प, चंद्रपूर येथे असणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे.
एकूण १२ टेबल्सची व्यवस्था करण्यात आली असून त्यापैकी १० टेबल्स EVM मतमोजणीसाठी व २ टेबल्स पोस्टल बॅलेटसाठी ठेवण्यात येणार आहेत. सर्व मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक व टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले.
आदर्श आचारसंहिता –
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात १५ डिसेंबर २०२५ पासून आदर्श आचारसंहिता लागू असून राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले.
दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजल्यानंतर कोणत्याही प्रकारचा प्रचार व प्रसिद्धी करण्यास मनाई राहील. तसेच १४ जानेवारी २०२६ रोजी मकरसंक्रांती सणाच्या पार्श्वभूमीवर कोणताही राजकीय प्रचार किंवा प्रसिद्धी करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
या प्रसंगी उमेदवार व राजकीय पक्षांद्वारे विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी निरसन केले व सर्वांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी आशा व्यक्त केली.



