प्रचार समाप्तीनंतर कोणत्याही माध्यमातून निवडणूक जाहिरातीस मनाई
राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश ; उद्या सायंकाळी ५.३० ला संपणार प्रचाराची मुदत

चांदा ब्लास्ट
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने मतदान १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, मतदानाच्या ४८ तास आधी म्हणजे १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता निवडणूक प्रचार-प्रसाराचा कालावधी संपणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर कोणत्याही प्रकारची निवडणूकविषयक जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नसल्याचे स्पष्ट निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या २४ डिसेंबर २०२५ रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठीचा प्रचार कालावधी समाप्तीनंतर समाप्तीनंतर इलेक्ट्रॉनिक, मुद्रित तसेच सोशल व डिजिटल माध्यमांमधून कोणत्याही प्रकारची निवडणूकविषयक जाहिरात प्रसिद्ध अथवा प्रसारित करता येणार नाही.
यासंबंधी सविस्तर बाबी राज्य निवडणूक आयोगाच्या ९ ऑक्टोबर २०२५ रोजीच्या ‘निवडणुकांच्या प्रयोजनार्थ प्रसारमाध्यम सनियंत्रण व जाहिरात प्रमाणन आदेश, २०२५ मध्ये नमूद केल्या आहेत. प्रचार समाप्तीनंतरचा कालावधी हा मौन कालावधी (Silence Period) असल्याने त्यामध्ये जाहिरातबाजीस संपूर्ण बंदी राहणार आहे. प्रचार समाप्तीनंतर मुद्रित माध्यमातील जाहिरातींसाठी पूर्वपरवानगी किंवा प्रमाणीकरणाचा प्रश्न उद्भवत नाही. यासंदर्भातील सर्व निर्देश राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार लागू राहतील.



