लाडक्या बहिणींचे पैसे थांबविण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांविरोधात भाजपचे आंदोलन
चांदा ब्लास्ट
राज्य सरकारने मकर संक्रांतीनिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय घेतला असताना, या निर्णयाला विरोध करत काँग्रेस पक्षाने सदर रक्कम सध्या जमा करू नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. या महिला-विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या वतीने चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट जवळ जोरदार आंदोलन करण्यात आले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जात आहेत. या योजनेमुळे महिलांना आर्थिक बळ मिळाले असून त्या स्वतःचे निर्णय घेण्यास सक्षम होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर १४ जानेवारी रोजी प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता.
मात्र काँग्रेस पक्षाने या निर्णयाला विरोध करत महिलांच्या खात्यात पैसे जमा करू नयेत, असे पत्र महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या वतीने निवडणूक आयोगाला पाठविले आहे. यामुळे महिलांमध्ये संतापाची भावना असून, काँग्रेसचा हा निर्णय महिलांच्या हिताविरोधी असल्याचा आरोप भाजपने केला आहे.
या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने जटपुरा गेट जवळ आंदोलन करून काँग्रेसच्या महिला-विरोधी धोरणांचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस पक्ष महिलांच्या हक्कांवर गदा आणत असल्याचा आरोप करत लाडक्या बहिणींच्या पैशांवर डोळा टाकणाऱ्या काँग्रेसचा भाजप रस्त्यावर उतरून विरोध करेल,” असा इशारा देण्यात आला. या आंदोलनात भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



