आमदार किशोर जोरगेवार आणि हंसराज अहिर यांचा पदयात्रेच्या माध्यमातून महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार

चांदा ब्लास्ट
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी शहरातून पदयात्रा काढत जोरदार प्रचार केला. या पदयात्रेच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले.
शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रोड पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीसह आणि पक्षाचे झेंडे हातात घेऊन कार्यकर्त्यांनी उत्साहात सहभाग घेतला. ठिकठिकाणी नागरिकांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत करत प्रचाराला भरघोस प्रतिसाद दिला.
यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती कटिबद्ध असून केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरू आहे. महानगरपालिकेत विकासाभिमुख नेतृत्व आवश्यक असून त्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
तर राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनीही नागरिकांना संबोधित करताना सांगितले की, भाजप हा केवळ निवडणूक जिंकणारा पक्ष नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या हितासाठी काम करणारा पक्ष आहे. ओबीसी, आदिवासी, दलित, महिला व युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांमुळे सामान्य जनतेला थेट लाभ मिळत आहे. या विकासाचा प्रवाह कायम ठेवण्यासाठी महायुतीला बळ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पदयात्रे मध्ये महायुतीचे उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शहरातील नागरिक सहभागी झाले होते. नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे महायुतीच्या प्रचाराला मोठी गती मिळाल्याचे चित्र यावेळी दिसून आले.



