मोबाईलच्या युगात मैदानी खेळांना प्रोत्साहन देणे कौतुकास्पद _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
साखरवाही येथे पुरुषांच्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन

चांदा ब्लास्ट
आ. मुनगंटीवार यांची बैलबंडीवर मिरवणूक आणि लाडू तुला
चंद्रपूर – मोबाईलच्या युगात मैदानी खेळ व पारंपरिक संस्कृती मागे पडत आहे. अशा परिस्थितीत मैदानी कबड्डी स्पर्धा आयोजित करून आपली परंपरा जपली जात आहे, ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. कार्यक्रमास्थळापर्यंत आमदार श्री. मुनगंटीवार यांची बैलबंडीवरून लेझीम पथकासह मिरवणूक काढण्यात आली. तसेच लाडूतुला करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. अनेक वर्षांनंतर बैलबंडीवर बसण्याचा योग आल्याची भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली. प्रेमाने व आपुलकीने केलेल्या स्वागताबद्दल साखरवाहीतील कार्यकर्ते व ग्रामस्थांचे त्यांनी आभारही मानले.
चंद्रपूर तालुक्यातील साखरवाही येथे जगदंब क्रीडा मंडळ व जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरुषांच्या भव्य कबड्डी सामन्यांचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिंद्र गावंडे, श्रेयस भालेराव, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, शोभाताई पिदूरकर, विनोद खापने, सुरेश सोयाम, सिद्धार्थ कवाडे, रामभाऊ कडुकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘१९९५ ते २००९ मी या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले. येथील नागरिकांनी मला कायमच प्रेम आणि आशिर्वाद दिले. त्यामुळे येथील कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण दिले, तेव्हा आनंदाने स्वीकारले. जवळपास पंधरा वर्षांनी आपल्याला भेटताना आनंद होत आहे. या गावाच्या सेवेसाठी कधीही आवाज द्या, तुमच्यासाठी धावून येईल. कारण १९९५ मध्ये तुम्ही निवडून दिले नसते तर मी आज शेतकऱ्यांचे, उपेक्षितांचे प्रश्न विधानसभेत मांडू शकलो नसतो.’



