मनोज मोडक यांची विदर्भ विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती
पत्रकारितेच्या कार्याचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
पुरोगामी पत्रकार संघाच्या विदर्भ विभागीय अध्यक्षपदी भद्रावतीचे वरिष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व लाॅर्ड बुद्धा टीव्हीचे जिल्हा प्रतिनिधी मनोज रामदास मोडक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजातील वंचित, शोषित जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या त्यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली.
ही घोषणा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सुर्यवंशी यांनी छिंदवाडा येथे झालेल्या संघाच्या कार्यालय उद्घाटन सोहळ्यात केली. त्यांनी सांगितले की, “पत्रकारितेतील सचोटी आणि जनतेसाठी असलेली बांधिलकी पाहूनच मोडक यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विदर्भातील पत्रकार संघटना अधिक बळकट होतील.”
या प्रसंगी अनेक पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते. मोडक यांनी आपल्या प्रतिक्रिया देताना म्हटले, “ही जबाबदारी म्हणजे सन्मानाबरोबरच एक कर्तव्य आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी लढणे आणि समाजहितासाठी खरी पत्रकारिता उभारणे हेच माझे ध्येय असेल.”
मोडक यांच्या नियुक्तीबाबत संपूर्ण विदर्भातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना अधिक सक्षम होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.