घुग्घुसमध्ये 6,300 चौ.फुट सार्वजनिक जागेवर बेकायदेशीर बांधकाम
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, तातडीने कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : घुग्घुस परिसरातील तब्बल 6,300 चौ.फुट सार्वजनिक खुली जागा (Public Open Place Plot) बेकायदेशीररित्या विक्री करून त्यावर बांधकाम सुरू असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या प्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रणयकुमार बंडी यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन देऊन तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, संबंधित जागा सार्वजनिक उपयोगासाठी राखीव असूनदेखील मूळ शेतमालकाने नोटरीमार्फत सहा जणांना ही जागा विक्री केली आहे. त्यावर अवैध बांधकाम सुरू असून त्यामुळे नागरिकांच्या हक्कांवर आणि सार्वजनिक हितावर गदा येत असल्याचे बंडी यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात प्रणयकुमार यांनी यापूर्वी 13 फेब्रुवारी 2025 रोजी घुग्घुस नगरपरिषदेकडे लेखी निवेदन दिले होते. मात्र, आजतागायत कोणतीही ठोस कारवाई किंवा माहिती उपलब्ध झालेली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत –
13 फेब्रुवारी 2025 रोजी दिलेल्या निवेदनावर आतापर्यंत झालेल्या कारवाईची लेखी माहिती द्यावी. बेकायदेशीर कब्जा व बांधकाम तातडीने हटवावे. संबंधित जागा शासन/नगरपरिषद ताब्यात घ्यावी. मूळ शेतमालक व त्यांच्या वारसांवर कारवाई करावी. सार्वजनिक हितासाठी या जागेवर विकासकामे करावीत.
हे निवेदन मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना प्रतिलिपी स्वरूपात पाठविण्यात आले असून, एक आठवड्याच्या आत स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी प्रणयकुमार यांनी केली आहे.