स्क्रब टायफस बाबत सतर्कता बाळगणे गरजेचे
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांचे आवाहन

चांदा ब्लास्ट
किटकजन्य आजारांतील स्क्रब टायफस हा जीवाणूमुळे होणारा व माईट्सद्वारे प्रसारित होणारा आजार आहे. याला बुश टायफस असेही म्हणतात. ओरिएंटल सुत्सुगामुशी जीवाणू संक्रमित चिगर (माईट्सच्या अळ्या) द्वारे प्रसारित होतो.पावसाळ्यात स्क्रब टायफसचे रुग्ण आढळून येतात. स्क्रब टायफस या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी अधिक सतर्क राहून सर्व प्रकारच्या उपचारात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.
स्क्रब टायफसचा प्रसार कसा होतो?
संक्रमित चिगर्स (माइट्सची अळी) जेव्हा मानवी त्वचेवर चावतात, तेव्हा जीवाणू रक्ताभिसरण प्रणालीमध्ये प्रवेश करतात आणि पुनरुत्पादन करतात, ज्यामुळे आजाराची लक्षणे दिसू लागतात.पावसाळ्याच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसून येतो.
प्रतिबंधात्मक उपाययोजना –
स्क्रब टायफसची लक्षणे आढळल्यास किंवा ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
पूर्ण बाह्यांचे व शरीर पूर्ण झाकले जाईल असे कपडे घालावेत.
घरात व परिसरात पाणी साचू देऊ नये.
आजुबाजूची स्वच्छता राखावी.
शेतात व जंगलात काम करणाऱ्या मजुरांनी कपडे धुऊन, उन्हात वाळवून वापरावेत.
गरज भासल्यास परिसरात तणनाशक, किटकनाशकाची फवारणी करावी.
उंदीर नियंत्रणाची उपाययोजना करावी.
स्क्रब टायफसची लक्षणे –
ताप येणे (६ ते २१ दिवसांच्या आत)
डोकेदुखी
स्नायू दुखणे
शरीरात कंप सुटणे
मळमळ, उलटी
थंडी वाजून ताप येणे
घशात दुखणे
कोरडा खोकला
श्वसनास त्रास होणे
जुलाब, गॅस्ट्रिक, सूज
लसिकाग्रंथी सुजणे
साखर, मूत्रामध्ये प्रथिने आढळणे
गंभीर अवस्थेत: गोंधळ, संभ्रम, फिट्स, रक्तदाब कमी होणे, शुद्ध हरपणे
स्क्रब टायफसचे निदान – स्क्रब टायफसचे निदान करण्यासाठी रक्त जल तपासणी करण्यात येते. प्रभावी उपचारांसाठी अचूक आणि वेळेवर निदान महत्त्वाचे आहे. रुग्णांचे चिन्ह, बाहय लक्षणांवरून आणि रुग्णाच्या वास्तव्य इतिहासाची तपासणी केली जाते. चिगर चाव्याच्या ठिकाणी व्रण असणे एक महत्वपूर्ण लक्षण आहे.
उपचार – स्क्रब टायफसचे प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी तातडीने वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे. प्रतिजैविके (Antibiotics) थेरेपी हा उपचाराचा आधारस्तंभ आहे. याकरिता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते. रुग्णास येणारा अचानक ताप, शरीरातील कमी होणारी पाण्याची मात्रा यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. उपचार न केल्यास किंवा उपचारास उशीर झाल्यास स्क्रब टायफसमुळे गंभीर गुतागुंत होऊ शकते, ज्यापैकी काही जीवघेणी असू शकतात. नागरिकांनी सतर्क राहून लवकर निदान, वेळीच उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्यास हा आजार पूर्णपणे टाळता व नियंत्रणात ठेवता येणे शक्य असल्याचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.नयना उत्तरवार यांनी सांगितले.