वर्धा नदीत दुचाकीस्वार पडला – 24 तासांपासून शोधमोहीम सुरूच
ग्रिल कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे गेला युवकाचा तोल - नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

अविनाश मोरे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी, कोठारी
राजुरा शहरापासून अवघ्या 5 किमी अंतरावर झालेल्या ट्रक ऑटो अपघातातील 6 निष्पाप नागरिकांच्या दुर्दैवी मृत्यूच्या बातमीची शाई वाळण्यापूर्वीच 40 वर्षीय युवक वर्धा नदीत वाहुन गेल्याची खळबळजनक माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की कोठारी येथिल रहिवासी अजय हरिश्चंद्र गिरटकर (40) हा युवक काही कामानिमित्य राजुरा येथे आला होता मात्र दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी वैयक्तिक कामाकरीता सायंकाळी 7:30 वाजताच्या सुमारास कोठारी येथुन राजुरा कडे येत असताना सदर युवकाची दुचाकी वर्धा नदीच्या पुलावर असलेल्या चिखलामुळे घसरली व अजय गिरटकर थेट नदीपात्रात कोसळला.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत असल्याने सदर युवक वाहुन गेला असल्याचे कळले. घटनेची माहिती कळताच राजुरा तसेच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शोध मोहीम सुरू केली. मात्र घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही युवकाचा शोध लागला नसुन कुटुंबीयांसह गावकरी चिंतेत सापडले आहे.
वर्धा नदीच्या पुलावरील हा अपघात राष्ट्रीय महामार्ग तयार करणाऱ्या ग्रील कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे घडला असुन कंपनीने नवा महामार्ग तयार करण्यासाठी मातीचे ढिगारे टाकले आहेत. ह्या नवीन रस्त्याला कुठलीही संरक्षक भिंत नाही किंवा ग्रील कंपनीने रस्त्यालगत नाली देखील खोदली नसल्याने पाऊस पडल्यानंतर चिकट असलेली ही माती रस्त्यावर येऊन चिखल तयार होत आहे. मोठी वाहने ह्यातून निघतात मात्र दुचाकी तसेच कार चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
बऱ्याचदा समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र प्रकाशझोतांमुळे दुचाकीस्वारांना समोरील रस्ता ओला असल्याने तसेच रस्त्यावर असंख्य खड्डे पडले असल्याने दिसत नाही. असाच काहीसा प्रकार ह्या अपघातात स्पष्ट दिसत असुन पुलावर पडलेली दुचाकी चिखलामुळे घसरली असल्याचे लक्षात येत आहे. ह्यापूर्वीही ह्याच मार्गावर बरेच अपघात झाले असुन काही निष्पाप लोकांना प्राणास मुकावे लागले आहे तरीही ग्रील कंपनीचे मस्तावलेले कर्मचारी कुठलीही उपाययोजना करत असल्याचे दिसत नसुन त्यांच्या बेजबाबदारपणामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कंपनीच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय परिस्थिती सुधारणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे.
वास्तविक बघता 24 तास वर्दळीच्या ह्या रस्त्यावर माती घसरून येऊ नये ह्यासाठी नवीन रस्त्याच्या उंचीकारांसाठी टाकलेल्या मातीच्या ढिगाऱ्यालगत नालीचे बांधकाम अथवा खोदकाम करणे गरजेचे आहे जेणेकरून वरून उतरणारे पाणी तसेच माती रस्त्यावर न येता नालीवाटे अडविण्यात येऊन प्राणहानी टाळता येणे शक्य आहे मात्र ग्रील कंपनीचे अभियंते तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी करत असलेल्या दुर्लक्षामुळे अपघातांचे व त्यातील बळींचे प्रमाण वाढत असल्याने संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी जनतेचे आंदोलन सुरू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.