चंद्रपूर शहरात २ टक्के घरे दुषित
आतापर्यंत आढळलेले १२ डेंग्यूचे रुग्ण रोगमुक्त

चांदा ब्लास्ट
महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.
मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन,त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12,चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत.मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत.
कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे.
पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
डेंग्युची लक्षणे –
डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.
डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –
डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी. पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.