घुग्घुस नगरपरिषदेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (चंद्रपूर) – स्वच्छ सर्वेक्षण 2025 आणि ‘माझी वसुंधरा अभियान 6.0’ या उपक्रमांतर्गत घुग्घुस नगरपरिषदेतर्फे दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी सर्व शाळांतील इयत्ता 5 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांसाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेत तब्बल 100 हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी मार्गदर्शनाखाली स्वतःच्या हस्ते सुंदर व पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करून आपली कला सादर केली.
नगरपरिषदेतर्फे उत्कृष्ट गणेशमूर्ती तयार करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिके प्रदान करण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी तसेच सर्व शाळांचे प्राचार्य व शिक्षक उपस्थित होते. कार्यशाळेच्या शेवटी सर्वांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची सामूहिक प्रतिज्ञा घेतली.