ब्रम्हपुरी तालुक्यात अवैध गॅस वापराविद्ध ‘धडक मोहीम’; दोन हॉटेलवर गुन्हे दाखल
तहसीलदारांच्या मार्गदर्शनात ७ भरारी पथके तैनात; इंधन साठवणूक व काळाबाजारावर प्रशासनाची करडी नजर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :_ जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे भविष्यात निर्माण होणारा संभाव्य इंधन तुटवडा आणि त्यातून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी ब्रम्हपुरी तालुका प्रशासन आता ‘ॲक्शन मोड’ मध्ये आले आहे. घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर तहसीलदारांनी कडक कारवाईचे निर्देश दिले असून, तालुक्यातील दोन नामांकित हॉटेल्सवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदेशानुसार, तहसीलदार सतीश मासाळ यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत ब्रम्हपुरी येथील ‘गुलमोहर बिर्याणी सेंटर’ व ‘हिंदुस्थान हॉटेल’ या दोन आस्थापनांवर घरगुती गॅस सिलेंडरचा अवैध वापर करताना पथक आढळून आले. याप्रकरणी पुरवठा निरीक्षक महेंद्र रामटेके यांनी ‘जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५’ च्या कलम ३ व ७ नुसार संबंधित हॉटेल मालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
तालुक्यातील हॉटेल, रेस्टॉरंट्स, व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि गॅस एजन्सींच्या गोदामांची नियमित तपासणी करण्यासाठी ७ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. यात पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित कांबळे यांच्या नेतृत्वात महेंद्र रामटेके, दिलीप मेश्राम आणि राजेश आंबाघरे यांचे मुख्य पथक कार्यरत आहे. महसूल मंडळांच्या स्तरावर मंडळ अधिकारी आणि तलाठी यांची ६ पथके तैनात करण्यात आली आहेत. या सर्व पथकांना स्थानिक पोलीस विभागाचेही विशेष सहकार्य लाभणार आहे. तालुक्यात सध्या ४ गॅस एजन्सी असून घरगुती गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
“नोंदणीकृत ग्राहकांना गॅस सिलेंडर केवळ OTP द्वारेच दिला जात आहे. जनतेने कोणत्याही अफवांना बळी पडून गॅस एजन्सीवर अनावश्यक गर्दी करू नये. गॅस पुरवठ्याबाबत तक्रार असल्यास कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेशी संपर्क साधावा.”
— सतीश मासाळ, तहसीलदार, ब्रम्हपुरी
घरगुती सिलेंडरचा व्यावसायिक वापर, अवैध साठवणूक किंवा चढ्या दराने विक्री करताना आढळल्यास गय केली जाणार नाही, असा सज्जड दमही प्रशासनाने दिला आहे.



