वर्धा न्यायालयासमोर घाणीचे साम्राज्य
नगर परिषदेच्या दुर्लक्षावर प्रश्नचिन्ह

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा शहरातील न्यायव्यवस्थेचे महत्त्वाचे केंद्र असलेल्या वर्धा न्यायालयाच्या समोर सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत आहे. न्यायालय परिसरात कचऱ्याचे ढीग, अस्वच्छता आणि दुर्गंधीमुळे येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना तसेच वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
न्यायालयासारख्या प्रतिष्ठित आणि संवेदनशील ठिकाणासमोर अशी अस्वच्छता दिसत असल्याने वर्धा नगर परिषदेच्या स्वच्छता व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा वेळेवर उचलला जात नसल्यामुळे येथे घाणीचे ढीग साचत असून दुर्गंधी पसरत आहे.
न्यायालयात दररोज मोठ्या प्रमाणात नागरिक, वकील आणि अधिकारी ये-जा करत असतात. मात्र अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखली जात नसल्याने शहराच्या प्रतिमेलाही धक्का बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
याकडे वर्धा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी तात्काळ लक्ष देऊन न्यायालय परिसरात नियमित स्वच्छता व्यवस्था सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. संबंधित विभागाने लवकरात लवकर कारवाई करून परिसर स्वच्छ ठेवावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
गरज आहे ती फक्त प्रशासनाच्या तत्परतेची जेणेकरून न्यायालयासमोरील हा परिसर पुन्हा स्वच्छ आणि सुस्थितीत दिसेल.



