ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कंपनीच्या मनमानीचा फटका ; शिवपंदन रस्ता उंच केल्याने शेते जलमय, शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
घारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या कामामुळे पावसाचे पाणी थेट शेतात; प्रशासनाकडे तातडीच्या कारवाईसह नुकसानभरपाईची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर :- ताडाळी एमआयडीसी परिसरातील घारीवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने केलेल्या कामांमुळे परिसरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे. कंपनीने शिवपंदन (शेत) रस्ता उंच केल्यामुळे पावसाचे नैसर्गिक पाणी थेट शेतांमध्ये साचत असून उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून संतप्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे.
मौजा अंतर्ल (ता. जि. चंद्रपूर) येथील गट क्र. ५८/३ मधील शेतकरी नामदेव का. जुनघरे व विशाल गु. जुनघरे यांनी तहसीलदारांकडे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने रस्ता उंच करताना पाण्याच्या निचऱ्याची कोणतीही व्यवस्था केली नाही. परिणामी प्रत्येक पावसात मोठ्या प्रमाणात पाणी शेतात घुसून सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे गंभीर नुकसान होत आहे.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून यापूर्वीही पाइपलाइन टाकणे, खोदकाम करणे व रस्त्याची दिशा बदलणे यांसारख्या कामांमुळे शेतीचे नुकसान झाले होते. वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल घेण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणाची तातडीने शासकीय मोजणी करून रस्त्यावरील अतिक्रमण हटवावे, पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी उपाययोजना कराव्यात तसेच झालेल्या शेती नुकसानीचा पंचनामा करून कंपनीकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
स्थानिक शेतकऱ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी असून प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून कंपनीवर योग्य कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे.



