चंद्रपुरात काँग्रेसतर्फे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ आंदोलन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : शिक्षण आणि डिग्री ही व्यक्तीच्या ओळखीची शान आहे, हे अधोरेखित करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरणार चौक येथे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले की, आज देशात स्वतःची डिग्री लपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे, जी सुशिक्षितांमध्ये नैराश्य निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा आणि उच्चशिक्षितांना राजकारणात व समाजात योग्य सन्मान मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शिवा राव, वरिष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, अनिरुद्ध वनकर, रामकृष्ण कोंड्रा, शिरीष गोगुलवार, अख्तर सिद्धिकी, नौशाद शेख, रमिश शेख आणि इतर सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.