जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूरचे सदस्य प्रविण चिमुरकर प्रयत्ननांना यश
४० महिला शेतकऱ्यांचे थकबाकी पैसे मिळाले परत

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील ४० दुग्ध व्यवसायिक महिला शेतकऱ्यांना थांबलेली थकबाकीची रक्कम अखेर परत मिळाली असून, या कार्यवाहीसाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद चंद्रपूरचे सदस्य प्रविण चिमुरकर यांच्या पुढाकाराचे कौतुक होत आहे.
दि. ०६ ऑगस्ट रोजी अर्चना बावणे आणि निखील बावणे यांच्या मार्फत या ४० महिला शेतकऱ्यांनी मराठवऱ्हाड मिल्क प्रोड्युसर कंपनी लि., महाराष्ट्र यांच्याविरुद्ध लेखी तक्रार प्रविण चिमुरकर यांच्याकडे दाखल केली होती. तक्रारीत दि. ०१ मे २०२५ ते १६ मे २०२५ या कालावधीतील एकूण ₹८९,२२६ रक्कम कंपनीकडून अद्याप न मिळाल्याचा आरोप करण्यात आला होता.
तक्रार मिळताच चिमुरकर यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांनी कंपनीचे चंद्रपूर जिल्हा प्रभारी आशिष शुक्ला तसेच कंपनीचे सेक्रेटरी रोशन कालमेघ, नागपूर यांच्याशी थेट संपर्क साधून सखोल चौकशी केली. चौकशीत कंपनीकडून शेतकऱ्यांचे पैसे रोखून ठेवण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. यावर चिमुरकर यांनी कंपनी अधिकाऱ्यांना त्वरित थकबाकी अदा करण्याचे निर्देश दिले.
चिमुरकर यांच्या हस्तक्षेपानंतर कंपनी सेक्रेटरी रोशन कालमेघ यांनी ताबडतोब कारवाई करत दि. ०८ ऑगस्ट रोजी सर्व ४० महिला शेतकऱ्यांच्या खात्यात संबंधित रक्कम जमा करण्यात आली. पैसे मिळाल्यानंतर महिला शेतकऱ्यांनी दिलासा व्यक्त केला आणि प्रविण चिमुरकर यांच्या कार्यवाहीचे मनःपूर्वक आभार मानले.
अनेकदा ग्रामीण भागातील शेतकरी, विशेषतः महिला, आर्थिक नुकसान सहन करूनही शांत राहतात. मात्र योग्य मार्गाने तक्रार नोंदवल्यास आणि संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत मुद्दा पोहोचवल्यास त्वरित न्याय मिळू शकतो.
“शेतकऱ्यांनी त्यांच्यावर अन्याय होत असेल अथवा त्यांची फसवणूक होत असेल तर शांत बसू नये. अन्यायाविरुद्ध आवाज उठविलाच पाहिजे. शेतकऱ्यांना अडचणी असल्यास आमच्याकडे तसेच तालुका कृषी अधिकारी, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.”
– प्रविण चिमुरकर, सदस्य, जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, चंद्रपूर