ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बांबू कारागीर महिलांसाठी मिळाले विक्रीचे नवे व्यासपीठ

बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्राचा अभिनव उपक्रम

चांदा ब्लास्ट

ग्रामीण भागातील गरजू बांबू कारागीर महिलांना शहरी बाजारपेठेत प्रवेश मिळावा, यासाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र, चिचपल्ली यांच्या वतीने एम. डी. आर. मॉल, चंद्रपूर येथे बांबू वस्तू विक्री स्टॉल उभारण्यात आला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध सामूहिक उपयोगिता केंद्रांमधील कारागीर महिलांनी बांबूपासून तयार केलेल्या पर्यावरणपूरक राख्या, आकर्षक व उपयोगी बांबू हस्तकला वस्तू या स्टॉलवर ठेवण्यात आल्या आहेत. ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना शहरातील प्रतिष्ठित ठिकाणी त्यांच्या हस्तकलेसाठी स्थिर आणि सन्माननीय विक्रीचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे व त्यातून बांबू कारागीर महिलांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या स्टॉलचे उद्घाटन केंद्राचे संचालक एम. एन. खैरनार यांनी केले. यावेळी केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, महिला बांबू कारागीर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना संचालक श्री. खैरनार म्हणाले, रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूरकरांनी या पर्यावरणपूरक राख्या आणि आकर्षक बांबू भेट वस्तूची मोठ्या प्रमाणात खरेदी करून या ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाला हातभार लावावा.

हा अभिनव उपक्रम अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संशोधन, शिक्षण व प्रशिक्षण) एम. एस. रेड्डी यांच्या मार्गदर्शनात राबविला गेला असून या विक्री केंद्रामुळे बांबू आधारित जीवनशैलीचा प्रसार, महिलांचे आर्थिक सशक्तीकरण, आणि पर्यावरणपूरक उत्पादनांचा प्रचार साध्य होत आहे. भविष्यात अशा स्टॉल्सचे जाळे चंद्रपूरसह विदर्भाच्या इतर शहरी भागातही उभारण्याचा मानस केंद्राचे संचालक श्री. खैरनार यांनी यावेळी व्यक्त केला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये