बम-बम-भोलेच्या गजरात देऊळगाव राजा येथे कावड यात्राची नगरप्रदक्षिणा…
हजारो भाविकांनी घेतले दर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त घृष्णेश्वर येथून पायी कावड यात्रा काढून, खांद्यावर पवित्र पाणी आणत हिंदू युवकांनी श्रद्धेचा व सेवाभावाचा अनोखा जागर घडवला. या पवित्र यात्रेची सांगता देऊळगाव राजा येथे भव्य अशा मिरवणुकीने झाली.
या वर्षी कावड यात्रेचे चौथे वर्ष असून, सावखेड भोई मेळा येथील महादेव मंदिरापासून यात्रेची सुरुवात झाली. यात्रेचा मार्ग शिंगणे नगर, धुंडीराज महाराज मठ, वाल्मिक नगर, बालाजी फारस, महाद्वार चौक, कमिटी चौक, चोंडेश्वरी चौक, बस स्थानक, चाकू, सिव्हिल कॉलनी असा होता आणि यात्रेची समाप्ती खोरेश्वर महादेव मंदिर येथे झाली.
या भव्य मिरवणुकीचे आयोजन सकल हिंदू समाज, देऊळगाव राजा यांच्या वतीने करण्यात आले होते. सकाळपासूनच गावात भक्तीमय वातावरण तयार झाले होते.
मिरवणुकीत अघोरी, कालिमाता, गोरिला, हनुमान यांच्या वेशातील सादरीकरण विशेष आकर्षण ठरले. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, भगव्या पताका आणि ‘हर हर महादेव’च्या घोषात मिरवणूक उत्साहात पार पडली.
यात्रेला नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, स्थानिक कार्यकर्त्यांनी अन्न, पाणी व विश्रांतीची चोख व्यवस्था केली होती. कावड यात्रेने गावात भक्तिभाव, एकता व संस्कृतीचा जागर घडवला असून युवकांमधील संघटनशक्ती अधोरेखित झाली.
शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस निरीक्षक ब्रह्म गिरी यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता