ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मलनिस्सारण प्रकल्प अंतर्गत खोदण्यात आलेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणी कामास वेग

चांदा ब्लास्ट

शहरातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 (Atal Mission for Rejuvenation and Urban Transformation) योजनेअंतर्गत महत्त्वाचे प्रकल्प मनपातर्फे हाती घेण्यात आले आहेत. या योजनेअंतर्गत केंद्र शासन तसेच राज्य शासनाच्या आर्थिक साहाय्याने चंद्रपूर शहर महानगर पालिकेमार्फत मलनिस्सारण प्रकल्प (Sewerage Scheme) राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाअंतर्गत विविध प्रभागांमध्ये भूमिगत मलवाहिनी पाइपलाइन टाकणे व नंतर रस्त्यांची दुरुस्ती/पुनर्बांधणी ही कामे वेगाने सुरू आहेत.

   सदर प्रकल्पाअंतर्गत आजतागायत एकूण 39,524 मीटर लांबीची पाइपलाइन टाकण्यात आली आहे. त्यापैकी 13,563 मीटर पाइपलाइन काँक्रीट रस्त्यांवर टाकण्यात आली असून, त्यामधून 9,571 मीटर रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण झाली आहे आणि 3,992 मीटर रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. याशिवाय,डब्ल्यू.बी.एम. (WBM) प्रकारचे रस्ते म्हणजे कच्चे रस्ते ज्यांची एकूण लांबी 22,220 मीटर असून, त्यातील 6,335 मीटर रस्त्यावर जी.एस.बी. (GSB) ची लेअरिंग म्हणजेच खडीकरण पूर्ण करण्यात आलेले आहे.

   शहराची वाढती लोकसंख्या बघता मलनिःस्सारणाची योग्य व्यवस्था हे दीर्घकालीन नियोजनाचे पाऊल आहे. यामुळे मोकळ्या नाल्यांमध्ये सांडपाणी जाण्याऐवजी ते प्रक्रिया केंद्रात गेल्याने शहरात दुर्गंधी आणि घाणीचे प्रमाण कमी होणार आहे. पुनर्वापर केलेले सांडपाणी बागायती,सिमेंट उद्योग,औद्योगिक वापर,वाटर स्प्रे बांधकामासाठी वापरता येईल. खुल्या नाल्यांमुळे रोगकारक जंतु व जी दुर्गंधी पसरते त्यावर मलनिःस्सारण प्रकल्पामुळे आळा घालता येऊ शकतो. तसेच यामुळे सुदृढ आरोग्य पातळीत वाढ होऊन मच्छरांचा त्रासही कमी होतो.

सदर कामांमुळे काही भागांतील नागरिकांना तात्पुरती गैरसोय झाली असली, तरी या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे शहराला भक्कम व टिकाऊ पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. काही भागांतील रस्त्यांचे काम अद्याप प्रलंबित असून, ते लवकरच पूर्ण केले जाणार आहे. संबंधित कामे पूर्णत्वाकडे असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये