हर घर तिरंगा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा

चांदा ब्लास्ट
“आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत ‘हर घर तिरंगा’ अभियान 2 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे विविध उपक्रम घेतले जात असुन 5 ऑगस्ट पीएम श्री सावित्रीबाई फुले प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेत 4 वी ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन देशभक्तीपर, तिरंगा, राष्ट्रध्वज, अशोकचक्र, पोस्टर, रांगोळी यांसारख्या विविध संकल्पनांवर आधारित सुंदर रांगोळ्या रेखाटल्या. स्पर्धेचे मूल्यांकन त्रयस्थ परीक्षकामार्फत करण्यात आले. सौंदर्य, रंगसंगती, संदेशवहन आणि स्वच्छता या निकषांवर आधारित प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक निवडण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक नागेश नित यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व देशप्रेमाच्या भावना जागृत राहाव्यात म्हणून असे उपक्रम सातत्याने राबवण्याचे महत्त्व सांगितले.
मागील तीन वर्षापासून ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. यावर्षीचे अभियान पहिला टप्पा 2 ते 8 ऑगस्ट,दुसरा टप्पा 9 ते 12 ऑगस्ट तर तिसरा टप्पा 13 ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात तिरंगा स्वयंसेवक यांची नोंदणी करून उत्कृष्ट काम केलेल्या स्वयंसेवकांना प्रमाणपत्र देणे, शाळेच्या भिंतीवर तिरंगाचे चित्र काढणे, तिरंगाविषयक बाबींचे प्रदर्शन भरवणे, रांगोळी स्पर्धा आयोजित करणे, तिरंगा राखी तयार करण्याची स्पर्धा आयोजित करणे असे विविध स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्याकडून पत्रलेखन करून ते जवान,पोलिसांना पोस्टल सेवेद्वारे पाठविणे. स्वत:चे घर, आजुबाजूचा परिसर, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविणे, तिरंगाची रोषणाई आणि लाईटिंग करणे असे विविध उपक्रम आहेत.
दुसऱ्या टप्प्याची सुरूवात 9 ऑगस्टपासून होत असून यात ‘तिरंगा महोत्सव’ राबविला जाईल. त्याचबरोबर तिरंगा मेळावा आणि तिरंगा कॉन्सर्ट कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तिरंगा बाईक रॅली किंवा सायकल रॅली सुद्धा काढण्यात येणार आहे. तिसरा टप्पा 13 ऑगस्टपासून सुरू होणार असून यात प्रत्येक घर, कार्यालय, वाहने यावर तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार आहे. अभियानात सर्वांचा सहभाग वाढावा यासाठी ध्वजारोहणच्या सेल्फी काढून केंद्र शासनाच्या www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.