मांगली येथे पुन्हा अवैध दारू विक्रीवर कारवाई
धीरज वरारकर यांच्यावर गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील मांगली येथे अवैध दारू विक्रीप्रकरणी धीरज वरारकर याच्यावर पुन्हा एकदा पोलिसांनी कारवाई केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावकऱ्यांनी संबंधितावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
दि. २४ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६:०० वाजता भद्रावती पोलीस ठाण्याच्या गुन्हे अन्वेशन पथकाने मांगली येथे छापा टाकला. छाप्यामध्ये आरोपीकडून ९० मि.ली. क्षमतेच्या सुमारे २०० देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. तसेच घटनास्थळावरून एनटॉर्क १२५ ही मोपेड दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांगलीसह परिसरातील काही गावांमध्ये आरोपीने अवैध दारू विक्रीचे जाळे उभारल्याची चर्चा आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवक व शेतकरी वर्ग व्यसनाधीन होत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात येत आहे. गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, वारंवार तक्रारी करूनही कारवाई होते आणि काही दिवसांनी पुन्हा अवैध व्यवसाय सुरू होतो. त्यामुळे संबंधिताला अभय कोणाचे, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे आरोपीला या गावातून तडीपार करण्याची मागणी केली आहे. जप्त मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून धीरज वरारकर यांच्याविरुद्ध संबंधित कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.



