ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक जिल्ह्यात नवोदय विद्यालयांची संख्या वाढावा

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात महान व्यक्तींचा विचारांचा समावेश करा

चांदा ब्लास्ट

दिल्लीत खासदार प्रतिभा धानोरकर यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट

चंद्रपूर – खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची दिल्ली येथे भेट घेऊन दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. जवाहर नवोदय विद्यालयांमुळे आजवर हजारो गरीब मुलांना गुणवत्तेच्या आधारावर चांगले शिक्षण मिळाले आहे, आणि अनेक विद्यार्थ्यांनी मोठे हुद्दे मिळवले आहेत. मात्र सध्या प्रत्येक जिल्ह्यात केवळ एकच नवोदय विद्यालय असल्याने अनेक होतकरू विद्यार्थ्यांना या विद्यालयात शिक्षण घेणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात दोन किंवा त्याहून अधिक विद्यालये उभारण्याची लोकहितकारी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासक्रमात भावी पिढीला भारतीय महान व्यक्तींच्या योगदानाचे महत्त्व कळावे आणि भविष्याकडे बघताना इतिहासाची जाणीव राहावी यासाठी महान व्यक्तींच्या योगदानाचा समावेश करण्याची प्रमुख मागणी देखील त्यांनी केली आहे.

यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मंत्र्यांना सांगितले की, जवाहर नवोदय विद्यालये ग्रामीण भागातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शिक्षणाचे केंद्र आहेत. या विद्यालयांमुळे अनेक गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळाले आहे. सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक जवाहर नवोदय विद्यालय आहे, पण ग्रामीण विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता ही संख्या अपुरी आहे. यामुळे अनेक पात्र विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहतात.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि त्यांना राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा करता यावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन किंवा अधिक नवोदय विद्यालये सुरू करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली आहे. यामुळे अधिक विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आणि ग्रामीण भागाच्या शैक्षणिक विकासाला चालना मिळेल.

तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबद्दल बोलताना खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सामाजिक विज्ञान अभ्यासक्रमात (इयत्ता ५ वी ते १० वी) भारतातील महान व्यक्तींचे विचार आणि कार्य समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. त्यांनी विशेषत्वाने संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि संविधानातील महत्त्वाच्या घटकांचा समावेश करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली, जेणेकरून युवा पिढीला संविधानाची मूल्ये आणि तत्त्वे समजू शकतील.

याचबरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य, विचार आणि त्यांची कुशल प्रशासन प्रणाली अभ्यासक्रमात समाविष्ट केल्यास विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि ते राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने पुढे जातील. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे समाजसुधारक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अभ्यासक्रमात असावे, जेणेकरून विद्यार्थी सामाजिक न्याय आणि महिला सक्षमीकरणाचे महत्त्व शिकू शकतील.

या मागण्यांमुळे विद्यार्थ्यांना भारताच्या समृद्ध वारशाची आणि वैविध्यपूर्ण इतिहासाची सखोल माहिती मिळेल. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शिक्षणमंत्र्यांना या दोन्ही महत्त्वपूर्ण प्रस्तावांवर सकारात्मक विचार करण्याची विनंती केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये