खड्ड्यांच्या रस्त्याचे ‘इव्हेंट आमदार मार्ग’ नामकरण
रस्त्यांवरील खड्ड्याविरोधात काँग्रेसचे आंदोलन

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर शहरातील महात्मा गांधी रोड, कस्तुरबा गांधी रोड, पठाणपुरा, इंजिनिअरिंग कॉलेज परिसर, जटपुरा गेट आदी प्रमुख रस्त्यांची अवस्था सध्या अत्यंत दयनीय बनली आहे. रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे, उखडलेले डांबर आणि धुळीच्या ढिगाऱ्यांमुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे वाहतूक खोळंबते असून अपघात, श्वसन विकार यांसारख्या गंभीर समस्या उद्भवत आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहर काँग्रेसने जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन छेडले. बागला चौक ते कामगार चौक या मार्गावरील खड्ड्यांना प्रतीकात्मक नाव देत ‘इव्हेंट आमदार मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. “मुक्त करा… मुक्त करा… चंद्रपूरला खड्डे मुक्त करा!”, “आमदारांचा इव्हेंट जोरात… पण रस्त्यावर जनतेचा जीव धोक्यात!” अशा जोरदार घोषणा देत कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
चंद्रपूर हे ऐतिहासिक, औद्योगिक आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, येथे दररोज बाहेरून येणाऱ्या नागरिकांची व वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मागील अनेक वर्षांपासून रस्त्यांचे सुस्थितिकरण झालेले नाही. अमृत जलप्रकल्प आणि भूमिगत गटार योजनेसाठी फोडले गेलेले रस्ते अजूनही दुरुस्त झालेले नाहीत.
महापालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे श्वसन विकार तर खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसने आंदोलन करत रस्त्यांच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधले आहे. शहरातील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत, अपूर्ण असलेली सिमेंट व डांबरीकरणाची कामे त्वरित पूर्ण करावीत, धूळ कमी करण्यासाठी नियमित रस्ते झाडणे व पाणी मारण्याची व्यवस्था करावी आदी मागण्या करण्यात आल्या.
जर या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले गेले नाही, तर काँग्रेस पक्षाच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी दिला. यावेळी आंदोलनात काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह सर्वधर्माचे प्रमुख देखील सहभागी झाले होते. बौद्ध भंते यांनी सहभागी होऊन चंद्रपूरच्या विकासासाठी प्रार्थना केली. हे आंदोलनात चंद्रपूर शहर महिला जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष राजेश अडुर, काँग्रेसचे वरिष्ठ कार्यकर्ते युसुफ भाई, तसेच किसान सेल, अल्पसंख्यांक सेल पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.