जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामीण भागातील डीबीटी लाभार्थ्यांच्या घरी भेट
महसूल सप्ताहअंतर्गत जाणून घेतल्या अडचणी

चांदा ब्लास्ट
महसूल सप्ताह अंतर्गत चंद्रपूर तालुक्यातील डीबीटी योजनांच्या लाभार्थ्यांच्या घरी भेट देऊन प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार व तहसीलदार विजय पवार यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या थेट आर्थिक सहाय्याची माहिती घेण्यात आली.
अजयपूर येथील लाभार्थी उध्दव देवगडे, रामचंद्र आंबिलकर, ताराबाई आंबिलकर, सुमन वैद्य यांच्या घरी भेट देऊन डीबीटी संबंधित आवश्यक ऑनलाईन प्रक्रियेचे मार्गदर्शन करण्यात आले. गृहभेटीदरम्यान दिव्यांग व मतिमंद लाभार्थ्यांच्या अडचणींचा विशेष विचार करण्यात आला. अशा लाभार्थ्यांना संजय गांधी योजनेचा लाभ तातडीने देण्यासाठी आवश्यक दिव्यांग प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
डीबीटीच्या लाभांची सुलभपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी संबंधित यंत्रणेला आवश्यक सूचना व निर्देश देण्यात आले. लाभार्थ्यांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करून डीबीटी संबंधित कागदपत्रे तहसिल कार्यालयातील संजय गांधी योजना शाखेत तात्काळ जमा करावीत, असे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांनी केले.
ग्रामीण व शहरी भागांतील लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी महसूल विभागातील संबंधित तलाठी व अधिकारी यांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांच्या घरी जाऊन संवाद साधला. या उपक्रमात नायब तहसिलदार राजू धांडे, मंडळ अधिकारी विशाल कुन्हेवार व तलाठी रमेश झिटे उपस्थित होते.