वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील कुंभेझरी या गावातून वडिलांच्या अथक परिश्रम व आशीर्वादाने शैक्षणिक क्षेत्रात व इतर क्षेत्रात प्रगती केलेल्या गोतावळे परिवारातील बंधूंनी त्यांचे वडील स्व.अर्जुन निवृत्ती गोतावळे यांच्या नवव्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. सलग नऊ व्या वर्षी वडिलांच्या पुण्यस्मरण दिनावरील अन्नदानावर व इतर बाबीवर होणारा खर्च वाचवून शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे शैक्षणिक साहित्य देण्याची परंपरा सलग नऊ वर्षापासून गोतावळे परिवारातील बंधू जपत आहेत.
जि. प.उच्च प्राथ शाळा टेकामांडवा येथील आदर्श शिक्षक दिपक गोतावळे हे वडिलांच्या इच्छेनुसार अन्नदानावर होणारा व्यर्थ खर्च टाळून विद्यार्थी उपयोगी साहित्य दरवर्षी विद्यार्थ्यांना वाटप करीत असतात. या वर्षी सुद्धा त्यांनी सहपरिवार टेकामांडवा शाळेतील १३२ विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी असे साहित्य वाटप केले.
याप्रसंगी दिपक गोतावळे,मंदाताई गोतावळे, मुख्याध्यापक लचु पवार, जि एस पांचाळ,जयश्री घोळवे,पायल कुकडे उपस्थित होते.त्यांच्या या कार्याने फार मोठा आदर्श समाजासमोर उभा केलेला आहे .यातून इतर लोकांनी सुद्धा प्रेरणा घेण्यासारखे आहे. त्यांच्या या अभिनव उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक व गावकरी यांच्याकडून खरे आदर्श शिक्षक म्हणून कौतुक केल्या जात आहे.