ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आदिवासी-बहुल भागातील खराब रस्त्यांवर सरकारचे दिशाहीन उत्तर

खासदार प्रतिभा धानोरकर यांची टीका

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्याच्या कोरपना तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात रस्त्यांची दुरवस्था आणि पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पुराच्या समस्येवर संसदेत प्रश्न विचारल्यावर केंद्र सरकारने दिशाहीन आणि वस्तुस्थितीला धरून नसलेले उत्तर दिल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सरकार टोलवाटोलवी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

खासदार प्रतिभा धानोरकर यांनी येरगरव्हान-चनाई खुर्द, कन्हालगाव-मांडवा, आणि इतर आदिवासी-बहुल भागांना जोडणाऱ्या रूपापेठ-खडकी-सवालहिरा रस्त्याची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवघेण्या प्रवासाकडे लक्ष वेधले होते. यावर, ग्रामीण विकास मंत्रालयाने “ग्रामीण रस्ते” हा राज्याचा विषय असल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला. पुढे, महाराष्ट्र सरकारने कळवल्यानुसार, हे रस्ते खराब स्थितीत नाहीत, असे मंत्रालयाने सांगितले.

मंत्रालयाने खडकी-तंगला-चेन्नई-कन्हाळगाव रस्त्याचे (T-16) बांधकाम प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (PMGSY)-I अंतर्गत १ मे २०१८ रोजी पूर्ण झाल्याचे आणि त्याची दोष दायित्व कालावधी (DLP) १ मे २०२३ रोजी संपल्याचे नमूद केले. तसेच, महाराष्ट्र सरकारने हा रस्ता चांगल्या स्थितीत आणि वाहन चालवण्यायोग्य असल्याचे म्हटले आहे. हे उत्तर स्थानिक नागरिकांच्या प्रत्यक्ष अनुभवाच्या पूर्णपणे विरुद्ध आहे, असे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले.

तसेच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तंगला चंपाती आणि जंभुलधारा येथील पूल पावसाळ्यात पाण्याखाली जातात का, असा प्रश्न विचारला होता, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे थांबते. यावर, सरकारने कबूल केले की तंगलापासून खडकी रस्त्यावर तंगला गावाजवळ असलेल्या पुलांवर पावसाळ्यात पाणी येते, ज्यामुळे वाहतूक सुमारे २ ते ३ तास थांबते. मात्र, या समस्येवर ठोस उपाययोजना करण्याऐवजी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना-II (MMGSY-II) सारख्या राज्य योजनांचा वापर केला जाईल, असे अस्पष्ट उत्तर देऊन सरकारने वेळ मारून नेल्याची टीका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली.

यासोबतच आदिवासी भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या गंभीर समस्यांवर सरकार ठोस कारवाई करण्याऐवजी दिशाहीन उत्तरे देत असल्याचा आरोप खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये