नागभीड तालुक्यात राबविण्यात येणार अभिनव उपक्रम
आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ

चांदा ब्लास्ट
नागभीड (चंद्रपूर) : राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे 1 ऑगस्ट रोजी महसूल दिन तर 1 ते 7 ऑगस्ट 2025 या कालावधीत महसूल सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या सप्ताहात नागभीड तालुका प्रशासनातर्फे अभिनव उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडीया यांच्या हस्ते महसूल सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला.
नागभीड तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्रमाला ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसीलदार प्रताप वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, पोलीस निरीक्षक, मुख्याधिकारी, तसेच नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, कार्यालयीन कर्मचारी, कोतवाल व मोठ्या प्रमाणात विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार बंटी भांगडीया म्हणाले, महसूल सप्ताह जनतेसाठी फायदयाच्या असून त्याचा सर्व जनतेने लाभ घ्यावा. तसेच तालुका प्रशासनाद्वारे राबविण्यात येणारे विविध उपक्रम कौतुकास्पद आहे, असे सांगून सदर उपक्रम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात तहसीलदार प्रताप वाघमारे म्हणाले, महसुलमंत्री यांच्या संकल्पनेतून महसूल सप्ताह-2025 साजरा करण्याचे निर्देश असून त्यानुषंगाने नागभीड तालुक्यात 01 ते 07 ऑगस्ट 2025 पर्यंत महसूल सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. या सप्ताहात तलाठी डिजीटल डायरी, महसूली कामकाजासाठी डिजीटल पंचनामा, दर शुक्रवारी सरपंच व पोलीस पाटील यांचेशी महसूल कक्षातून व्हर्च्युअल संपर्क, कार्यालयीन कर्मचा-यांच्या मासिक मुल्याकंनासाठी ‘रेटींग सिस्टीम’ तसेच शासकीय जमिनी व जमीन विषयक विविध कायदे, धोरण यांची जनमानसास माहिती व्हावी व शासकीय जमिनींचे संरक्षण व्हावे यासाठी ‘भुमी साक्षरता अभियान’ असे अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
यावेळी महसूल खात्याच्या विविध लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले. त्यात लक्ष्मीमुक्ती, अपाक, नोंद कमी वर्ग -2 ते वर्ग – 1, शिधापत्रिका, ॲग्रीस्टॅक, PM किसान, नैसर्गिक आपत्ती अनूदान वाटप, सामाजिक अर्थसहाय्य़ वाटप या सोबतच नगरपरिषद, महिला बालकल्याण व कृषी विभागाच्या योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. उपस्थितांचे आभार मंडळ अधिकारी श्री. बोड्डावार यांनी मानले.