शिक्षकांनी अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज – प्रा. प्रफुल्ल माहुरे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दिवसेंदिवस बदलणाऱ्या शैक्षणिक प्रणालीमध्ये शिक्षकांनी तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. अध्यापन प्रभावी करण्यासाठी ध्वनीचित्र माध्यमे, संगणकाधारित साधने, दृकश्राव्य साधने तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शिक्षण साहित्य यांचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे यांनी व्यक्त केले.
एकलव्य इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज, बिबी यांच्या वतीने आयोजित शिक्षक प्रशिक्षण शिबिरात ते प्रमुख प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करत होते. त्यांनी शिक्षकांनी केवळ विषयाचे ज्ञान देणारे व्यक्ती न बनता विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणारे, प्रेरणा देणारे आणि मार्गदर्शक बनावे, असा सल्ला दिला. अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या समजुतीचा स्तर ओळखून योग्य पद्धती वापरणे, दृकश्राव्य साधनांचा वापर करून विषय अधिक प्रभावी बनवणे, तसेच नवे शैक्षणिक धोरण, नवोदय विचार आणि मूल्याधारित शिक्षणाचे तत्त्व आत्मसात करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. आशिष देरकर होते. प्राचार्य नितेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पूजा बरमन यांनी केले तर आभार प्रदर्शन विठ्ठल टोंगे यांनी मानले. या प्रशिक्षण शिबिरात शाळेतील सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
विविध उपक्रम, चर्चा, उदाहरणे आणि प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शिबिर रंजनात्मक व माहितीपूर्ण झाले. या प्रशिक्षणामुळे शिक्षकांना अध्यापनामध्ये नवदृष्टीकोन व नवे कौशल्य आत्मसात करण्याची प्रेरणा मिळाली.