रेल्वे स्थानकांवरील वाढीव किमती, प्रवाशांची होणारी लूट थांबवा !
खासदार प्रतिभा धानोरकर यांचा रेल्वे मंत्रालयावर गंभीर आरोप

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : बल्लारशाह रेल्वे स्थानकावर खाद्यपदार्थांची छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री होत असल्याचा मुद्दा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी लोकसभेत उपस्थित केला. यावर रेल्वे मंत्रालयाने दिलेले उत्तर प्रवाशांची दिशाभूल करणारे आणि वास्तवापासून दूर असल्याचे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे. त्यांनी या गंभीर समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याचे आवाहन सरकारला केले आहे.
खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे स्थानकांवर मंजूर दरानुसार उच्च दर्जाचे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. जास्त किंमत आकारल्याच्या 4 प्रकरणांमध्ये 35,500 रुपयांचा दंड आकारण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, FSSAI मंजूर वस्तू विकल्या जात असून, नियमित तपासणी केली जात असल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या या उत्तरावर तीव्र आक्षेप नोंदवताना खासदार धानोरकर म्हणाल्या की, “रेल्वे मंत्रालय केवळ कागदी घोडे नाचवत आहे.” फक्त 4 प्रकरणांवर कारवाई करणे ही ‘हिमनगाची फक्त एक टीप’ आहे, प्रत्यक्षात शेकडो प्रवाशांना दररोज वाढीव दराने खाद्यपदार्थ खरेदी करावे लागतात. ‘नियमित आणि आकस्मिक तपासणी’ केवळ कागदावरच असून, ‘रेलमदद’ सारख्या तक्रार यंत्रणा कुचकामी असल्याचे त्यांनी म्हटले. बिलिंग, डिजिटल पेमेंट आणि आरपीएफ मोहिम हे केवळ दिखाव्याचे उपाय असून, प्रवाशांना अजूनही शुद्ध आणि परवडणारे भोजन मिळत नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केवळ दंडात्मक कारवाई पुरेशी नसून, प्रभावी अंमलबजावणी आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी आणि हक्काशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. या गंभीर आरोपांवर रेल्वे मंत्रालय कोणती पुढील पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.