ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी साताऱ्याचा मानसन्मान ठेवला

मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले गौरवोद्गार

चांदा ब्लास्ट

छत्रपतींचे वारसदार घरी आले… ही आमच्यासाठी गौरवाचीच बाब! – आ. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आधी आपण लंडनला जाऊन बघायचे अन् परत यायचो. ते भारतात आणण्याचे काम आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारा येथे आणली. सातारा ही मराठ्याची राजधानी होती. भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला. नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते, तो त्यांचा अधिकारही होता. पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली. मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला. सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊंबद्दल प्रचंड आदर आहे, असे गोरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शनिवारी (२६ जुलै) चंद्रपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ.मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि चंद्रपूरकरांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी आ.मुनगंटीवार परिवाराकडून बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, सौ.सपनाताई मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,राहूल पावडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राऊत, सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू, डॉ. मंगेश गुलवाडे, अल्काताई आत्राम, किरण बुटले, सविता कांबळे, मीनाताई देशकर, नम्रता ठेमसकर, सर्व तालुका अध्यक्ष, भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ना.शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही सर्व जण राज्यात काम करतोय. त्यांचे स्थान आमच्या सर्वाच्या दृष्टीने फार वरचे आणि महत्वाचे आहे. मी सुधीरभाऊंएवढा दांडगा अभ्यास आणि वक्तृत्व शैली आजवर बघितली नाही. इतिहास आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास, प्रत्येक विषयाची आकडेवारीनिशी अचूक माहिती, हे भाऊंकडे बघूनही शिकणे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. सुधीरभाऊंकडे बघून जेवढे शिकता येईल, तेवढे शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. सुधीरभाऊ कुठल्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या विभागातही गेले. तरी सगळे अलर्ट मोडमध्ये येतात. भाऊंना काहीही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल तेच त्यांना पाहिजे. विधानसभेतही आम्ही बघितलं की सरकारची, मंत्र्यांची चुकही ते दाखवतात, असे ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. भाजप आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे, आपल्यासाठी नाही तर ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्याप्रमाणे काम झाले पाहिजे. अधिकाऱ्यांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली पहिले शिक्षा समजले जायचे. पण आता उलटं झालं आहे. भाऊंचे नेतृत्व असल्यामुळे विकास वेगाने झाला आहे. हा परिसर आता दुर्लक्षित राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी या परिसराला नवी ओळख दिली. मंत्री झाल्यापासून असं स्वागत अद्याप कुणीही केलं नाही, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं.

मा.सुधीरभाऊंच्या सुचनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते, पूल सर्व कामे मार्गी लाऊ, असे आश्वासन देत त्यांनी आ.मुनगंटीवार यांना सातारा येथे प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले.

यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात पहिली भेट सुधीर मुनगंटीवार यांची घेतल्याबद्दल त्यांच्या नम्रतेचे कौतुक करीत आभार मानले. आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं, हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले.

श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. महाराजांच्या १३व्या पिढीचा वारसा चालवणारे आहेत. आपण मावळे म्हणून १३व्या पिढीतील शिवभक्त आहोत. ते घरी आल्यामुळे आज अत्यानंद झाला. आपसूक ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष निघत होता. या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की, एक बेशुद्ध व्यक्तीसुद्धा शुद्धीवर येईल. १२ गडकिल्ले युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी इतर देशातील लोक बैठकीत बसले होते. तेव्हा आम्ही छत्रपतींचे वैशिष्ट्य सांगितले. आजवर झालेल्या सर्व राजा महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने वेगळे राजे होऊन गेले. कारण सर्व राजे ‘हे माझे राज्य आहे..’, असे म्हणायचे. पण छत्रपती शिवराय म्हणायचे की ‘हे रयतेचे राज्य आहे..’, असे सांगणारा आणि माननारा हा एकच राजा होऊन गेला, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले.

आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला आहे. यासाठी आम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते. छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवरील मातीचा कण अन् कण जगातल्या कुठल्याही धातुपेक्षा महागडा आहे. कारण धातुपासून महागड्या वस्तू बनवता येतील. पण या मातीच्या कणाकणांतून माणूस घडवता येतो. या मातीची किंमत केवळ भारत देशच नाही, तर जगातील सर्वच देश मानतात. आता तर दरवर्षी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सरकारच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराजांनी ज्या वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनख व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझीअमने आपल्याला तीन वर्षांसाठी दिले आहेत. वाघनख येथेच कायम रहावे, हा आपला पुढचा प्रयत्न असणार आहे.

शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे महत्वाचे खाते आहे. शिवेंद्रराजे यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत रस्ते आणि टनेल बांधायचे आहेत. छत्रपतींच्या मातोश्री आपल्या विदर्भाच्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर आहे. आजही तेथे त्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. तेथे भव्य शिवसृष्टी उभारली जाते आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये