ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शांतीधाम रथ (शववाहिका) बंद; आजाद समाज पार्टीकडून नगर परिषदेला निवेदन

तात्काळ दुरुस्तीची मागणी

चांदा ब्लास्ट

 आजाद समाज पार्टीच्या वतीने नगर परिषद घुग्घुस यांना शांतीधाम रथ (शववाहिका) बंद अवस्थेत असल्याबद्दल निवेदन देण्यात आले. हे निवेदन सुरेश पाईकराव यांच्या मार्गदर्शनाखाली, रिता देशकर (जिल्हा महासचिव) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

नगर परिषद घुग्घुसमार्फत चालविण्यात येणारी शांतीधाम रथ सेवा सध्या अनेक दिवसांपासून बंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाहनाचा अल्टर्नेटर आणि बॅटरी खराब झाल्यामुळे ती ब्रेकडाऊन स्थितीत असून, अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

सद्यस्थितीत पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, आणि अशा परिस्थितीत घुग्घुस परिसरात कोणत्याही व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यविधीसाठी शासकीय शववाहिका उपलब्ध नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. मृतदेह वाहून नेण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्याने अनेक कुटुंबांना मानसिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

ही बाब सार्वजनिक सेवेकडे होणाऱ्या गंभीर दुर्लक्षाचे उदाहरण असून, आजाद समाज पार्टीने यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत:

 शांतीधाम रथ तात्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या सेवेस पुन्हा सुरू करावी. संबंधित कर्मचाऱ्यांकडून झालेल्या दुर्लक्षाबाबत स्पष्टीकरण मागवावे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेसाठी तत्काळ यंत्रणा सज्ज ठेवावी. तसेच, संबंधित ठेकेदाराविरुद्ध योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

या निवेदन प्रसंगी रिता देशकर (जिल्हा महासचिव), वैशाली भालशंकर, शोभाबाई पाईकराव, लता धोटे, करुणाबाई दुर्योधन, अरुणा करमनकर, बबन वाघमारे, राकेश कातकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

स्थानिक नागरिकांमध्ये या विषयावर तीव्र नाराजी असून, नगर परिषदेने या गंभीर प्रश्नाची तात्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये