ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याकडून बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आणण्याचे निर्देश

जिल्ह्यातील ग्रामीण भागात सेवा आणि सुविधा पोहचवा

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : जिल्ह्यात भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) च्या सेवांचा आढावा घेण्यासाठी दूरसंचार सल्लागार समितीची बैठक खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत बीएसएनएलच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करत, जिल्ह्यातील प्रत्येक गावात मोबाइल सेवा आणि ब्रॉडबँड सुविधा पोहोचवण्यावर भर देऊन बीएसएनएलला ‘अच्छे दिन’ आणण्याचे निर्देश खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिले.

खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी “कर्मचाऱ्यांनी केवळ नोकरी म्हणून न पाहता जनसेवा व बीएसएनएल ला परिवार मानून काम केल्यास निश्चितच चित्र बदलेल,” असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागात ऑनलाइन कामांची वाढती गरज लक्षात घेऊन अविरत इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यासंबंधात चर्चा करून अधिकाऱ्यांना सेवा सुधारण्याच्या सूचना दिल्या.

 यावेळी बीएसएनएलचे वरिष्ठ महाप्रबंधक प्रांजल ठाकूर, उपमहाप्रबंधक मुख्यालय एन. एम. टेंगशे, उपमहाप्रबंधक ऑपरेशन डी. जी. घोंगडे, मुख्य लेखा अधिकारी काजल डे. तसेच दूरसंचार सल्लागार समितीचे सदस्य पांडुरंग आगलावे, देविदास सातपुते, ताजुद्दीन शेख, पवन मेश्राम यांची उपस्थिती होती.

बैठकीत बीएसएनएलच्या अनेक समस्यांवर चर्चा झाली, ज्यात पावसाळ्यात सेवा विस्कळीत होणे, खोदकामामुळे तारा तुटून सेवा खंडित होणे आणि काही ठिकाणी बँकांमधील सेवा ठप्प होणे या प्रमुख समस्या होत्या. विसापूर येथील बीएसएनएल टॉवर सतत बंद असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि तात्काळ उपाययोजनांची मागणी केली. तसेच जिवती तालुक्यातील बीएसएनएल सेवे संदर्भात चिंता व्यक्त करीत सेवेत सुधारणा करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी ४जी सेवा संपूर्ण जिल्ह्यात लवकरच पूर्णपणे सुरू करावी आणि ५जी कडे वाटचाल करणाऱ्या खाजगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या सेवांची गुणवत्ता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे, असेही खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी सांगितले. भारत नेट आणि महानेट-१ प्रकल्पांचा प्रभावीपणे वापर करून ग्रामपंचायतींपर्यंत पोहोचलेल्या फायबर कनेक्शनचा पूर्ण उपयोग व्हावा यासाठी लोकांना डिजिटल साक्षर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जुनी उपकरणे तात्काळ बदलून प्रचार व प्रसाराच्या माध्यमातून दर्जेदार सेवा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये