ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील वनक्षेत्र विवादावर तोडगा काढण्यासाठी उद्या बैठक

मुख्यमंत्री फडणवीसांनी आयोजित केली बैठक ; आमदार देवराव भोंगळे यांचा पुढाकार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती : जिवती तालुक्यातील बहुप्रलंबित वनक्षेत्राच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आणि तालुक्यातील विकासकामांना गती देण्यासाठी राजुरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे यांच्या पुढाकाराने मंगळवार, १५ जुलै २०२५ रोजी मुंबई येथील विधान भवनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळ सभागृह दुसरा मजला विधान भवन दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक जिवती तालुक्यातील वनक्षेत्र आणि संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी पहिल्यांदाच आयोजित करण्यात आली असून, यामुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची आशा आहे.

           या बैठकीला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, अपर मुख्य सचिव (महसूल), अपर मुख्य सचिव (वने), चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि जिवती तालुक्यातील काही लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, जिवती तालुक्यातील शिष्टमंडळ या बैठकीत सहभागी होऊन तालुक्यातील प्रमुख समस्यांबाबत निवेदन सादर करणार आहे.जिवती तालुका पूर्णपणे वनक्षेत्र घोषित केल्याने येथील विकासकामे रखडली आहेत. विशेषत: जिवती नगरपंचायतीतील घरकुल योजनेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, वनविभागाने कोदेपूर, गुडशेला आणि जिवती येथील तलावांची कामे अडवून ठेवल्याने स्थानिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.याशिवाय, तेलंगणा-महाराष्ट्र सीमेवरील परमडोली, मुक्कादमगुडा, कोट्टा, लेंडीजळा, महाराजगुडा, अंतापूर, इंदिरानगर, पद्मावती, येसापूर, नारायगुडा, भोलापठार, लेंडीगूडा, शंकरलोधी, कामतगुडा आणि गौरी या चौदा गावांतील जमिनीच्या मोजणीचे प्रस्ताव पूर्ण झाले असून, शेतकऱ्यांना तातडीने जमिनीचे पट्टे देण्याची मागणी जोर धरत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची गंभीर दखल घेत तातडीने ही बैठक आयोजित केली आहे. यामुळे जिवती तालुक्यातील वनक्षेत्र विवाद, रखडलेली विकासकामे आणि शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भातील प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा आहे.भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष महेश देवकते, तालुका अध्यक्ष दत्ता राठोड, गोविंद टोकरे,तुकाराम वारलवाड, अशपाक शेख सह स्थानिक शिष्टमंडळ उपस्थित राहून या बैठकीत तालुक्यातील सर्व समस्यांचा पाढा मांडणार असून, शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.

जिवती तालुक्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांमध्ये या बैठकीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. वनक्षेत्र विवादामुळे वर्षानुवर्षे रखडलेल्या समस्यांवर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे. विशेषत: जमिनीचे पट्टे आणि तलावांची कामे सुरू झाल्यास तालुक्यातील विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये