ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावती शहरातील नागरी समस्या सोडविण्याची मागणी

शिवसेनेच्या माजी नगरसेवकांचे मुख्याधिकारी यांना निवेदन सादर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          भद्रावती शहरातील रस्त्यांची दुरवस्था, नाल्यांची साफसफाई, दिवाबत्तींची अकार्यक्षमता, बाजारपेठेतील अस्वच्छता, आणि स्मशानभूमीतील अनागोंदी व्यवस्था व रस्त्यावरील मोकाट जनावरांचा वावर अशा अनेक नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत नगर परिषदेला निवेदन सादर केले. शहरातील नागरिक विविध अडचणींना सामोरे जात असून, त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या निवेदनाच्या माध्यमातून शहरातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. मागील काही दिवसांपासून रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे, त्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याशिवाय, अनेक भागांतील दिवाबत्त्या बंद अवस्थेत आहेत. नाल्यांमध्ये गाळ, प्लास्टिक आणि झाडाझुडपांचा अडथळा झाल्याने पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेता, नाल्यांची तातडीने स्वच्छता करण्यात यावी,अशी मागणी करण्यात आली.

मटन मार्केट आणि मच्छी मार्केटमध्ये अस्वच्छता असल्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे या ठिकाणी नियमित स्वच्छता मोहीम राबवण्याची गरज आहे. स्मशानभूमी आणि सार्वजनिक जागांची स्वच्छता देखील दुर्लक्षित आहे. तसेच शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांमुळे व मोकाट जनावरांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्ताचे योग्य नियोजन करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली.

शहरात येणाऱ्या धार्मिक सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवरील वीज व्यवस्था सुरळीत ठेवणे, रस्त्यांवर साचणाऱ्या पाण्याची व्यवस्था करणे आणि नागरिकांना अडचण न होता शांततेत सण साजरे करता यावेत यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत, अशी विनंती करण्यात आली.

हे निवेदन नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी,माजी नगरसेवक राजु सारंधर, चंदु खारकर, पप्पु सारवण, महेश जिवतोडे, शोभा पारखी, लक्ष्मी पारखी, शीतल गेडाम, सुनीता टिपले, सामाजिक कार्यकर्ते राहुल सोनटक्के व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

शहराच्या समस्या केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात सोडवल्या जातील, अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये