होमिओपॅथी डॉक्टरांना मॉडर्न मेडिसिनची नोंदणी?
आयएमएचा तीव्र विरोध; ब्रह्मपुरीत २४ तास ओपीडी बंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
_महाराष्ट्र शासनाने १५ जुलै २०२५ पासून लागू होत असलेल्या एका नव्या आदेशानुसार, ज्या बी.एच.एम.एस (होमिओपॅथी) डॉक्टरांनी सीसीएमपी (Certificate Course in Modern Pharmacology) नावाचा एक वर्षाचा ब्रिज कोर्स पूर्ण केला आहे, अशा डॉक्टरांची नोंदणी आता महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या स्वतंत्र रजिस्टरमध्ये केली जाणार आहे._
_या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) महाराष्ट्र राज्याने जोरदार आवाज उठवला आहे. हा निर्णय सामान्य जनतेच्या आरोग्याशी थेट खेळ करणारा, अन्यायकारक व अत्यंत धोकादायक असल्याचे आयएमएचे म्हणणे आहे._
न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना शासनाचा आदेश?
_फेब्रुवारी २०२५ मध्ये आयएमए ने याच निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्र उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निर्णय अद्याप आलेला नाही. तरीही १५ जुलैपासून हा आदेश लागू करण्याचा शासनाचा निर्णय संभाव्य न्यायालयीन अवमान ठरतो, असे आयएमए चे म्हणणे आहे._
सीसीएमपी कोर्स म्हणजे नेमकं काय?
_बी.एच.एम.एस डॉक्टरांसाठी तयार करण्यात आलेला सीसीएमपी कोर्स हा केवळ १ वर्षाचा ब्रिज कोर्स आहे, ज्यामध्ये फार्माकॉलॉजी आणि मेडिसिनसारख्या विषयांचे फक्त प्राथमिक शिक्षण दिले जाते. IMA च्या मते, हा कोर्स एम.बी.बी.एस. च्या ५.५ वर्षांच्या सखोल अभ्यासक्रमाच्या तोडीचा अजिबात नाही._
संभाव्य धोके काय?
_IMA नुसार, जर या कोर्सधारकांना मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिशनर मान्यता दिली गेली, तर सामान्य रुग्ण भ्रमित होतील._
आपत्कालीन वैद्यकीय सेवा, योग्य निदान, औषधांचे अचूक प्रमाण, सर्जरीसंबंधी ज्ञान
या सर्व बाबतीत अपुरे शिक्षण असलेल्या डॉक्टरांकडून उपचार केल्यास रुग्णाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे.
_त्याचबरोबर एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या सायंटिफिक प्रतिमेलाही धक्का बसू शकतो, असा इशारा IMA ने दिला आहे._
ब्रह्मपुरीत २४ तास OPD सेवा बंद
_आयएमए ब्रह्मपुरी शाखेच्या वतीने ११ जुलै सकाळी ८ वाजल्यापासून ते १२ जुलै सकाळी ८ वाजेपर्यंत सर्व ओपीडी सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे._
ही माहिती ब्रह्मपुरी येथील आयएमए हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी आयएमए ब्रह्मपुरीचे अध्यक्ष डॉ. भारत गणवीर, सचिव डॉ. सतीश दोनाडकर, सहसचिव डॉ. निकेश खोब्रागडे, तसेच डॉ. अरविंद नाकाडे, डॉ. राव, डॉ. मिनू गणवीर, डॉ. वर्षा नाकाडे, डॉ. म्हैसकर, डॉ. अंजली वाडेकर उपस्थित होते._
जनतेला आयएमए चे आवाहन
_डॉक्टरकडे उपचार घेण्यापूर्वी त्यांची शैक्षणिक अहर्ता आणि नोंदणी क्रमांक तपासा. आपत्कालीन किंवा सर्जरीसंबंधी उपचारासाठी फक्त MBBS/MD/MS/DNB डॉक्टरांकडेच जावे. “आरोग्य हा तुमचा मूलभूत हक्क आहे – तो संपूर्ण प्रशिक्षित आणि पात्र डॉक्टरांकडूनच मिळवावा.”हा आदेश तात्काळ मागे घ्यावा अन्यथा IMA राज्यव्यापी तीव्र आंदोलन छेडेल, असा स्पष्ट इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने दिला आहे._