ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बेरोजगारांच्या हक्कावर शासकीय कर्मचाऱ्यांचा डल्ला

तालुक्यात शासकीय कर्मचारी हेच राजकारणी आणि ठेकेदार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- अतिशय दुर्गम, डोंगराळ आणि विकासापासून वंचित असलेला तालुका म्हणून जिवतीची ओळख आहे. त्यातल्या त्यात येथे कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळे येथे प्रचंड बेरोजगारी आहे. प्रत्येक गावात विविध जाती धर्माचे तरुण आपापल्या आईवडिलांना पारंपारिक शेतीमध्ये काम करून मदत करतात आणि त्यावरच त्यांची उपजीविका सुरु आहे. प्रत्येक गावातील हेच तरुण गावातील लोकांच्या सुखादुखामध्ये धावून जातात, गावामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवतात, जनतेची सेवा करतात,कोणी आजारी असले आणि वेळेवर वाहन उपलब्ध नसेल तर स्वतःच्या दुचाकीवर रुग्णाला दवाखाण्यात घेऊन जातात, प्रत्येकाच्या लग्नकार्यात दिवसरात्र राबतात,गावात कोणी मयत झाले तर रात्रभर जागरण करून अंत्यविधी होईपर्यंत तेथेच असतात. या तरुणांना अपेक्षा असते की गावाच्या राजकारणात आम्हाला संधी मिळेल. खरंतर या तरुणांच्या पाठीशी गावातील लोकं सुद्धा असतात पण गावाच्या राजकारणात मात्र गावातून शासकीय कर्मचारी झालेले किंवा त्याच गावात कर्मचारी म्हणून काम करणारे लोकं त्यांच्या पत्नीला उभे करतात आणि प्रचंड लक्ष्मीदर्शनाच्या बळावर विजयी होतात. त्यामुळे दिवसरात्र राबणारा तरुण मात्र राजकीय संधीपासून दूर राहतो. मग हेच कर्मचारी नोकरीला कुठेही असले तरी गावातील आपल्या सोयीच्या माणसांना हाताशी धरून गावातील सर्वच कामे स्वतः करतात आणि प्रचंड पैसा कमावतात. त्यामुळे गावातील सच्चा कार्यकर्ता, बेरोजगार तरुण यांच्या हक्कावर आणि कामावर शासकीय कर्मचारी एकप्रकारे डल्ला मारतात आणि बिचारा प्रामाणिक कार्यकर्ता वैफल्यग्रस्त होतो. इतकेच नाहीतर जिवती तालुकातील कर्मचारी यांची ठेकेदारी ची साखळी तयार झाल्याचे अनेकांनी बोलून दाखविले, एक कर्मचारी रेती गिट्टी सप्लायर, दुसऱ्याची जेसीबी ट्रकटर, तिसऱ्याचे सिमेंट लोहा, चौथ्याचे लेबर आणि पाचव्याचे पैसे असे संघटितपणे ठेकेदारी करतात. आणि त्यासाठी गावातील काही तरुणांना ओल्या पार्ट्यादेऊन काम होईपर्यंत देखरेखिसाठी ठेवतात आणि कोणी कामाबाबत विचारणा केली तर दमदाटी, शिवीगाळ करण्यासाठी माणसे पोसतात अशी अत्यंत गंभीर व्यथा अनेक गावातील तरुणांनी मांडली.त्यामुळे या शासकीय कर्मचाऱ्यांची गावात दहशत सुद्धा असल्याचे अनेकांनी बोलून दाखविले.

       हे शासकीय कर्मचारी तालुक्यातील ग्रामपंचायत्तीमध्ये आपल्या सोयीच्या माणसाला सत्तेमध्ये बसविण्यासाठी प्रयत्न करतात, पंचायत समिती मध्ये सदस्यांची पळवापळवी करून आपल्या सोयीच्या माणसाची सत्ता बसवतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तान्तरामध्ये यांचा सक्रिय सहभाग असतो हेही अनेकांनी बोलून दाखविले. हि सगळी उठाठेव करण्याचे कारण म्हणजे चंद्रपूर येथील कार्यालयामधील अधिकारी वर्गाला खुश करून आपल्या सोयीच्या ग्रामपंचायत्तीमध्ये निधी वळता करणे आणि तेथील कामे स्वतः करणे.

याच कामातून पैसा कमावणे आणि कमावलेल्या पैशातून पुन्हा सोयीच्या माणसाला सत्तेत काबीज बसविणे. त्यामुळे स्थानिक बेरोजगार तरुण मात्र हतबल झाला असून कुटुंबाच्या आर्थिक समस्यामुळे बेजार,बेचैन आणि वैफल्यग्रस्त झाला आहे. या सर्व तरुणांच्या पाठीशी राहून या तालुक्यातील राजकीय चित्र बदलवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे डॉ. गोतावळे यांनी सांगितले. यामुळे स्वतःला याचा प्रचंड त्रास होणार आहे याची कल्पना आपल्याला असून ते सहन करू पण तरुणांना साथ देऊ,कारण आपल्या डोळ्यादेखत अन्याय होत असेल आणि आपण जर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठविणार नसेल तर आपण कुठल्याही महापुरुषांचे नाव घेण्याच्या लायकीचे असणार नाही. त्यामुळे महापुरुषांना आदर्श मानणारे आणि कुठल्याही पक्षात काम करणारे तरुण या अन्यायाविरुद्ध स्वतः आवाज उठवतील किंवा मला सहकार्य करतील अशी अपेक्षासुद्धा व्यक्त केली. सोबतच संघटित शासकीय कर्मचारी ठेकेदाराची पोलखोल करून स्थानिक तरुणांच्या हक्काची राजकीय संधी आणि रोजगार त्यांनाच मिळवून देण्यासाठी लढत राहण्याची भूमिका त्यांनी मांडली.

    जिवती तालुका काँग्रेस कमिटी चा अध्यक्ष झाल्यानंतर संपूर्ण तालुक्याचा दौरा केला त्यावेळी स्थानिक सुशिक्षित बेरोजगार, सामाजिक कार्यकर्ते यांनी आपल्या गावातून तयार झालेले कर्मचारी तसेच गावात कार्यरत कर्मचारी यांनी गावचे राजकारण आणि गावातील शासकीय कामे यावर कब्जा केला असून आमच्यावर प्रचंड अन्याय होत आहे आणि त्यातून वैफल्य येत असल्याचे सांगितले.

डॉ. अंकुश गोतावळे, अध्यक्ष -तालुका काँग्रेस कमिटी

      स्थानिक युवकांना राजकारणामध्ये संधी मिळाली पाहिजे आणि बेरोजगार युवकांच्या हातात काम मिळणे आवश्यक आहे या देशामध्ये गलिच्छ राजकारण्यांनी आणि ठेकेदारी विचार सरणीच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी बेरोजगार युवकांना राजकारणात आणि शासकीय कामे मिळूदेत नाही म्हणून युवकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे

सुदाम राठोड, तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना

          मी स्वतः सुद्धा राजकारणात संधी मिळेल आणि हाताला कामही मिळेल म्हणून राजकारणात सक्रिय झालो. पण येथे शासकीय कर्मचारी यांची घुसखोरी आणि राजकारणात यशस्वी होण्यासाठी त्यांनी सुरु केलेल्या पैशाच्या पॅटर्न पुढे आमच्यासारख्याचा निभाव लागणे कठीण आहे. मी स्वतः आणि काही तरुणांनी मिळून स्थानिक विषयाला घेऊन सतत नऊ दिवस अन्नत्याग अमरन उपोषण केले त्याचा फायदा तालुक्यातील जनतेला नक्कीच होईल पण एकही दिवस समाजाचे किंवा तालुक्यातील जनतेचे काम न करता शासकीय कर्मचारी त्यांच्या घरच्या लोकांना निवडणुकीत उभे करतात आणि अर्थकारणामुळे विजयी होतात. त्यामुळे राजकीय संधी आणि ठेकेदारी येथून आम्ही शासकीय कर्मचाऱ्यामुळे हद्दपार होणार की काय असे वाटत आहे.

विजय गोतावळे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा)

    तालुक्यातील अनेक शासकीय कर्मचारी शासकीय सेवेत राहून सुद्धा गावात राजकारण करतात यांचे भाऊ वडील पत्नी किंवा नातेवाईकाना निवणुक लढवायला लावतात प्रचंड पैसा असल्यामुळे पैश्याच्या जोरावर आयुष्यभर गावात राबणाऱ्या होतकरू युवकाला राजकारनात पराभूत करतात.हेच कर्मचारी जिंकलेल्या नातेवाईकांच्या नावाने ठेकेदारी करून प्रचंड माया गोळा करतात आणि पुन्हा राजकरण करतात.अशी खदखद अनेक युवकांनी माझ्याकडे व्यक्त केली. हि राजकारणातील घुसखोरी मोडून काढण्यासाठी नक्कीच काम करणार आहे.

     अमर राठोड नगरसेवक तथा कार्याध्यक्ष _ राष्ट्रवादी युवक काँग्रेस (श प) चंद्रपुर

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये