तरोडा येथे दुर्मिळ विषारी फुरसे (Saw Scaled Viper) सापाला जीवदान

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील तरोडा (सुंदरनगर) येथील श्रीराम मंदिर परिसरात साप दिसल्याची माहिती मिळताच एमएच २९ हेल्पिंग हँड्सचे सर्पमित्र रमेश भादीकर यांना संपर्क केला गेला. माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहिले की हा भारतातील चार प्रमुख विषारी सापांपैकी एक असलेल्या फुरसे (Saw Scaled Viper) प्रजातीचा साप होता. त्यांनी योग्य दक्षता घेत या सापाला सुरक्षितरित्या पकडले आणि तेथे उपस्थित नागरिकांना या सापाबद्दल महत्त्वपूर्ण माहिती दिली.
रमेश भादीकर यांनी सांगितले की, फुरसे हा भारतातील वायपर प्रजातीतील सर्वात लहान आणि अत्यंत विषारी साप आहे. याचे मुख्य भक्ष्य विंचू (बिच्छू) असते. मात्र, विंचू पकडताना फुरसेला त्याच्या दंशाचा धोका असतो. विशेष म्हणजे, फुरसेच्या शरीरात विंचूच्या विषाला सहन करण्याची क्षमता असते. अलीकडील काळात विंचूंची संख्या घटत असल्यामुळे फुरसे सापांची संख्याही कमी होत आहे. कोकण भागात विंचू मोठ्या प्रमाणात आढळत असल्याने तेथे फुरसे साप अधिक प्रमाणात दिसतात. या सापाच्या शरीरावरील खवले आरीसारख्या (करवतसारख्या) आकाराचे असल्याने याला “Saw Scaled Viper” असे नाव दिले गेले आहे.
यानंतर, या सापाची वन विभागात नोंदणी करण्यात आली व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
या बचाव कार्यात योगदान दिले:
रमेश भादीकर, राजू भोगेकर, अनिकेत कुमरे, नितीन मानुसमारे, समीर गुरनुळे, संतोष गुमूलवार, दिवेंद्र भोगेकर, अमोल मांढरे, रोहित सरजत, दीपक, कुणाल, आशीष, दिनेश आदी.