ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पाटील संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरा

दीपक बोरकर यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस पाटील पदाकरिता सन 2015 मध्ये भरती झाली होती त्यानंतर दहा वर्षाचा कालावधी लोटूनही पोलीस पाटील पदाकरिता भरती प्रक्रिया न राबविल्यामुळे जिल्ह्यात जवळपास 550 पदे रिक्त आहेत, सदर पदे तात्काळ भरण्याची मागणी शिवसेने चे माजी उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर यांनी केली.

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बुलढाणा दौऱ्यावर आले असता बुलडाणा येथे मंत्री महोदयांना ताफा थांबविण्याची विनंती करून निवेदन दिले.

जिल्ह्यातील सदर पदे रिक्त असल्यामुळे एका एका पोलीस पाटलाकडे दोन पेक्षा अधिक गावांचा अतिरिक्त प्रभार असल्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो तसेच शालेय कामकाजासाठी लागणारे विविध दाखले (उदा. वंशावळ इत्यादी) वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी व विद्यार्थी वर्गांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे. सिंदखेडराजा उपविभागातील देऊळगाव राजा तालुक्यामध्ये पोलीस पाटील संवर्गाची 60 पदे मंजूर असून कार्यरत पदे केवळ 19 व रिक्त पदे 41 आहेत. सिंदखेडराजा तालुक्यामध्ये 101 पदे मंजूर असून 45 पोलीस पाटील कार्यरत आहेत तर 56 पदे रिक्त आहेत. सिंदखेडराजा उपविभागामध्ये एकूण 161 मंजूर पदापैकी कार्यरत 64 तर तब्बल 97 पदे रिक्त आहेत ज्याचे प्रमाण 60% पेक्षाही अधिक आहे, अशीच परिस्थिती मलकापूर जळगाव जामोद मेहकर खामगाव बुलढाणा उपविभागाची आहे.

पोलीस पाटील हा गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करीत असतो, गावातील तंटे गावातच मिटण्यास मदत होते. महसुली अधिकाऱ्यांना जसे की, मंडळ अधिकारी, तलाठी व तहसीलदार यांना महसुली तंटे मिटविण्यास मदत होते. सदर भरती प्रक्रिया राबविल्यास जिल्ह्यातील शेकडो बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन जिल्ह्यातील पोलीस पाटील यांचे वरील अतिरिक्त कामाचा त्रास कमी होईल.

 जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी यापूर्वी पोलीस पाटील पदाकरिता भरती प्रक्रिया राबविण्याबाबत कार्यक्रम घोषित केला होता परंतु सदर भरती प्रक्रिया कोणत्या कारणाने थांबविली याबाबत माहिती नाही.

 जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी थांबविलेली भरती प्रक्रिया राबविणे बाबत आपले स्तरावरून कार्यवाही करणे करता सूचना कराव्यात असेही निवेदनात दीपक बोरकर यांनी म्हटले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये