ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एटीएम बंद झाल्याने ग्राहकांची गैरसोय – सुदाम राठोड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- मागील दोन महिन्यापासून तालुक्यातील पाटण येथे असलेले भारतीय स्टेट बँकेचे एटीएम केंद्र बंद अवस्थेत आहे. त्यातच बँकेमधून छोटी रक्कम मिळत नसल्याने कर्मचारी, व्यापारी बँकेचे ग्राहक त्रस्त झाले आहेत. पाटण येथे दररोज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येतात. त्यामुळे पाटण येथे मोठी वर्दळ राहते. तालुक्यात स्टेट बँक, व ग्रामीण विदर्भ कोकण बँक अश्या दोनच राष्ट्रीयकृत बँका आहेत. त्यापैकी ग्राहकांच्या सुविधेसाठी पाटण ला स्टेट बँकेने एटीएम केंद्र सुरू केले आहे. ग्रामीण बँकेकडे ही सुविधा उपलब्ध नाही. शेकडो कर्मचारी, व्यापारी, छोटे व्यावसायिक तसेच नागरिकांचे स्टेट बँकेत खाते आहेत.पैसे काढण्यासाठी नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागते. त्यातच मागील दोन महिन्यांपासून एटीएम केंद्र बंद पडले आहे. त्यामुळे जनतेला एटीएम असूनही नसल्यासारखे आहे.

याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी नोंदवूनही दखल घेतली जात नाही.एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅशलेस व्यव्हार करण्याचे आवाहन केले तर दुसरीकडे बँकांमधून सुविधा मिळत नसल्याने कॅशलेस व्यवहाराचे घोडे अडले आहे. बँकेचे अधिकारीसुद्धा वेळकाढू धोरण राबवीत असल्याने जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.त्यामुळे ग्राहकांची समस्या लक्षात घेता स्टेट बँकेने तत्काळ एटीएम सेवा सुरू करावी अशी मागणी जय विदर्भ पार्टीचे सुदाम राठोड यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

◆ ग्राहकांच्या सेवेसाठी एटीएम सुरू करावे

ग्राहकांच्या सुविधेसाठी येथील स्टेट बँकेच्या पाटणच्या वतीने एटीएम केंद्र सुरू करण्यात आले आहे. परंतु कधी तांत्रीक अडचणींमुळे, कधी पैशाअभावी हे केंद्र बंद रहात आहे. याचा फटका बँकेच्या ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

— सुदाम राठोड, सामाजिक कार्यकर्ता

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये